उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या चार मुलींपैकी तीन मुलींचा धबधब्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील अनंतगिरी येथे घडली आहे. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सेल्फी काढताना घडली दुर्घटना
माहितीनुसार, हुकुंपेटा मंडलातील जांबुवालसा गावातील चार मैत्रिणी उन्हाळी सुट्टीत फिरण्यासाठी मुलुगुम्मी धबधब्याजवळ गेल्या होत्या. यावेळी १६ वर्षीय अंजली पाण्याबाहेर उभी राहून तिघींचे फोटो आणि व्हिडीओ काढत होती. या तिघी मुली पाण्यात खेळत होत्या. मजा करत, हसत पाण्यात बागडत होत्या.
दरम्यान, धबधब्याजवळील घसरड्या दगडांवर उभे राहून सेल्फी काढत असताना अचानक त्या तिघींचा तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. पोहता येत नसल्यामुळे त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. हे पाहताच अंजलीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, तिलाही पोहता येत नसल्याने तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलींना पोहता येत नसल्यामुळे त्या पाण्याबाहेर येऊ शकल्या नाहीत. तसेच पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्या वाहून गेल्या. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकीचा बचाव, तिघींचा दुर्दैवी अंत
याबाबत माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. या घटनेत अंजलीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तृषा (१७), रत्नकुमारी (१६) आणि पवित्रा (१६) या तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
धबधबा लहान, पण धोका मोठा
अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित धबधबा आकाराने लहान असला तरी परिसर अत्यंत घसरडा आहे आणि याठिकाणी पाण्याचा प्रवाहही तीव्र असतो. त्यामुळे पर्यटकांसाठी हा भाग धोकादायक ठरू शकतो.
पोलिसांचे आवाहन
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे आणि पाण्याच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी.