३७० कलम हटवण्याची संधी मिळाल्याचा अभिमान; पंतप्रधानांचे प्रतिपादन, राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन Photo-X (@narendramodi)
राष्ट्रीय

३७० कलम हटवण्याची संधी मिळाल्याचा अभिमान; पंतप्रधानांचे प्रतिपादन, राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन

अनुच्छेद ३७०ची भिंत पाडून टाकण्याची संधी भाजपच्या सरकारला मिळाली त्याचा पक्षाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.

Swapnil S

लखनऊ : अनुच्छेद ३७०ची भिंत पाडून टाकण्याची संधी भाजपच्या सरकारला मिळाली त्याचा पक्षाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त लखनऊमध्ये राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने चांगल्या प्रशासनाचा जो वारसा निर्माण केला तो आता केंद्र आणि राज्यस्तरावर नव्या उंचीवर गेला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक सकारात्मक प्राप्तीचे यश एकाच कुटुंबाशी जोडले जात होते हे आपल्याला विसरता येणार नाही. आधी एका कुटुंबाचे पुतळे लावले जात होते, आज प्रत्येक महान व्यक्तीला सन्मान मिळत आहे. आधी एकाच कुटुंबाचे गौरवगान होत असे. भाजपने प्रत्येकाच्या योगदानाचा सन्मान केला, असे पंतप्रधान म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लखनऊमध्ये राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन केले. येथे त्यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांचे अनावरण करून त्यांना आदरांजली वाहिली.

प्रेरणास्थळावर ६५-६५ फूट उंचीचे पं. दीनदयाल उपाध्याय, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयी बिहारी वाजपेयी यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. प्रत्येक पुतळा ४२ टन वजनाचा आहे. प्रेरणा स्थळ ६५ एकर क्षेत्रात २३० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये याचे बांधकाम सुरू झाले होते

राष्ट्र प्रेरणा स्थळावर कमळाच्या आकाराचे वस्तूसंग्रहालय ९८ हजार चौ. फूटावर उभारण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर मोदी यांनी या वस्तूसंग्रहालयास भेट दिली आणि मुखर्जी, उपाध्याय आणि वाजपेयी यांचे योगदान दर्शविणाऱ्या साहित्याची पाहणी केली.

पंतप्रधान मोदी नाताळनिमित्त चर्चमध्ये

देशात नाताळचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाताळनिमित्त गुरुवारी दिल्लीच्या कॅथेड्रल चर्च ऑफ रिडेम्पशनमध्ये नाताळच्या सकाळच्या प्रार्थनासभेला उपस्थित होते. दिल्लीचे बिशप रेव्ह. डॉ. पॉल स्वरूप यांनी मोदी यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली.

भारत १ ट्रिलियन डॉलरचे निर्यात लक्ष्य गाठणे कठीण; जागतिक मंदीमुळे निर्यातीचा वेग मंदावला: GTRI

पेट्रोल पंपांमध्ये भारत जगात तिसरा! संख्या १ लाखांवर, १० वर्षांत दुप्पट वाढ; टॉप २ देश कोणते?

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाणे-नवी मुंबईत ताणतणाव; महाविकास आघाडीत जागेचा पेच कायम

नातवाला दिल्लीतून मुंबईला आणा, ९० वर्षीय आजीची भेट घडवून द्या; HC चा महत्त्वपूर्ण आदेश

कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठाजवळ भारतीय विद्यार्थ्याची हत्या; हल्लेखोर फरार, आठवड्याभरातील दुसऱ्या घटनेमुळे खळबळ