आशियातील सर्वात मोठे ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले; १८ लाखांहून अधिक फुलांनी खुलली बाग! X | PTI
राष्ट्रीय

आशियातील सर्वात मोठे ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले; १८ लाखांहून अधिक फुलांनी खुलली बाग!

काश्मीरमधील दाल सरोवराच्या काठावर वसलेले आणि आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले ट्युलिप उद्यान सोमवारी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. दरम्यान, हे उद्यान नियोजित वेळेच्या सुमारे १० दिवस आधीच खुले करण्यात आले कारण खोऱ्यात वाढलेल्या उष्म्यामुळे येथील फुले लवकर उमलली होती.

Swapnil S

श्रीनगर : काश्मीरमधील दाल सरोवराच्या काठावर वसलेले आणि आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले ट्युलिप उद्यान सोमवारी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. दरम्यान, हे उद्यान नियोजित वेळेच्या सुमारे १० दिवस आधीच खुले करण्यात आले कारण खोऱ्यात वाढलेल्या उष्म्यामुळे येथील फुले लवकर उमलली होती.

१८ लाखांहून अधिक फुले

या उद्यानात ट्युलिपच्या ७० हून अधिक प्रजाती आहेत. उद्यान अधिक नयनरम्य दिसावे या उद्देशानं उद्यान विभागाने फुलांची संख्या वाढवली असून, या बागेत एकूण १८ लाखांहून अधिक फुले आहेत. दरम्यान, उद्घाटनाच्या दिवशी याला पर्यटकांकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. उद्यानाचे औपचारिक उद्घाटन होण्यापूर्वीच, उद्यानाबाहेर मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. तसेच या उद्यानाचे आकर्षण अधिक वाढवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले आहे.

सौंदर्याचा आनंद

पर्यटन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही एक नवी सुरुवात ठरेल. त्यांना अत्यंत कठीण काळातून जावे लागले होते. मात्र, परिस्थिती सतत बदलत असते; आणि आम्हाला आशा आहे की, परिस्थिती सुधारेल, ज्यामुळे बाहेरील लोकांना येथे येऊन जम्मू आणि काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल, असे यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितलं.

सुरक्षा तपासणी

दरम्यान, गेल्यावर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गेल्या वर्षी पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्या ४४ पर्यटन स्थळांमध्ये ट्युलिप उद्यानाचाही समावेश होता. मात्र, आता सुरक्षा तपासणीनंतर या वर्षी हे उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

१० दिवस आधीच उद्यान खुले

२००८ मध्ये काश्मीरमधील पर्यटन स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेले हे ट्युलिप उद्यान सहसा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले केले जाते. मात्र, सध्या काश्मीरमध्ये उष्णता वाढली आहे. गेल्या अनेक दशकांतील उष्णता पाहता, गेल्या फेब्रुवारी महिन्यात जास्त उष्णता होती. त्यामुळे ट्युलिपची फुले लवकर उमलली. त्यामुळे हे उद्यान नियोजित वेळेच्या सुमारे १० दिवस आधीच खुले करण्यात आले.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब