Assam Train Accident : आसाममध्ये रेल्वेचा मोठा अपघात! कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले; बचावकार्य सुरू, Video 
राष्ट्रीय

आसाममध्ये रेल्वेचा मोठा अपघात! कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरले; बचावकार्य सुरू, Video

Assam Train Accident : आसाममधील दिगारू स्थानकात कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. पाहा VIDEO.

Mayuri Gawade

आसाम : आसाममध्ये बुधवारी (दि. ११) सकाळी रेल्वेचा अपघात झाला. कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरले. गुवाहाटीजवळील कामरूप (मेट्रो) जिल्ह्यातील दिगारू रेल्वे स्थानकात सकाळी ६.५४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची वृत्तं समोर आली आहेत. मात्र, जखमींचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसल्याचं ईशान्य सीमांत रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या रेल्वेला मार्ग देताना एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी कोलकाता-सैरांग एक्स्प्रेस आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकात येत होती. दुसऱ्या एका रेल्वेगाडीला आधी मार्ग देण्यासाठी ही एक्स्प्रेस स्थानकात घेतली जात होती. याच वेळी रेल्वेचं इंजिन आणि त्यामागील सहा डबे रुळावरून घसरले. अपघातानंतर प्रवासी आणि स्थानिक नागरिक रेल्वेजवळ जमा झाले. घटनेचे काही व्हिडीओही समोर आले असून, त्यामध्ये रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याचं दिसत आहे.

रेल्वेचा अपघात कशामुळे झाला?

ईशान्य सीमांत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिगारू स्थानकात रेल्वेगाडी येत असताना लोको पायलटला गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही. त्यामुळे इंजिन आणि सहा डबे रुळावरून घसरल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

प्रवाशांना दुखापत झाली का?

अपघातानंतर काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक वृत्तं प्रसिद्ध झाली होती. मात्र, ईशान्य सीमांत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सुरुवातीपासूनच जीवितहानी झाल्याची नोंद नसल्याचं सांगितलं. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अधिकृत निवेदन जारी करून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं आणि कोणालाही दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट केलं.

प्रवाशांसाठी दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था

अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केलं. वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्रवाशांना पुढील प्रवास करता यावा, यासाठी दुसऱ्या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, अपघातग्रस्त डबे हटवण्यासह रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अर्थखाते आम्हाला मिळालेच पाहिजे; सुनील तटकरेंची भूमिका

Mumbai : गिरगाव चौपाटीवर छठपूजेला परवानगी देण्यास नकार; उच्च न्यायालयाचा तातडीचा दिलासा नाही

पुन्हा ५००, २००० रु.च्या नोटा बंद करा; आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मागणी

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का

नंदीग्राम फाईल्स पुन्हा उघडणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा