ANI
राष्ट्रीय

इंडिया आघाडीची सरशी; ७ राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणूक निकाल, काँग्रेसला दहा, तर भाजपला दोन जागा

लोकसभा निवडणूक निकालानंतर सात राज्यांमध्ये १३ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही इंडिया आघाडीने यशाची कमान चढतीच ठेवल्याचे शनिवारी जाहीर झालेल्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालानंतर सात राज्यांमध्ये १३ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही इंडिया आघाडीने यशाची कमान चढतीच ठेवल्याचे शनिवारी जाहीर झालेल्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीने १३ पैकी १० जागांवर विजयाची पताका फडकावली असून भाजपला केवळ दोन जागांवर रोखले आहे, तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

पश्चिम बंगालमधील चार, हिमाचल प्रदेशातील तीन, उत्तराखंडमधील दोन आणि पंजाब, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूतील प्रत्येकी एका जागेसाठी बुधवारी मतदान पार पडले होते. काँग्रेस, तृणमूल, आप आणि द्रमुक हे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत. काँग्रेसने भाजपशासित उत्तराखंडमधील दोन आणि हिमाचल प्रदेशमधील दोन अशा चार जागांवर विजय मिळविला आहे. आपने पंजाबमधील जालंधर पश्चिम जागा जिंकली असून द्रमुकने तामिळनाडूतील विक्रावंदी येथे विजय मिळविला आहे. भाजपने हिमाचल प्रदेशातील हमीरपूर आणि मध्य प्रदेशातील अमरवार या जागा जिंकल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांची पत्नी आणि काँग्रेसच्या उमेदवार कमलेश ठाकूर यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार होशियारसिंह यांचा देहरा मतदारसंघात ९३९९ मतांनी पराभव केला आहे. उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.

बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांतील १३ जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला; तामिळनाडूमधील विक्रवंडी; मध्य प्रदेशातील अमरवारा; उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर; पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या ठिकाणी मतदान झाले होते, तर शनिवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.

भाजपने विणलेले भयाचे जाळे तुटले

सात राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे भाजपने विणलेले भय आणि संभ्रमाचे जाळे फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रातही पराभव अटळ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचा महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही पराभव होईल, असे भाकित ज्युपिटर ॲस्ट्रोलॉजीने वर्तविले आहे.

भाजपच्या नकारात्मक राजकारणाला नाकारले

देशातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांबद्दल काँग्रेसने आनंद व्यक्त केला असून हे निकाल म्हणजे देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याचे म्हटले आहे. या विजयाबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भाजपच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारले आहे हे निकालावरून सिद्ध होते, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता