राष्ट्रीय

बंगालच्या उपसागरात तिसरे वादळ; ताशी १२० ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाले असून, येत्या दोन दिवसांत या वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

Swapnil S

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाले असून, येत्या दोन दिवसांत या वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. हे वादळ २० नोव्हेंबरच्या रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज असून, यावेळी ताशी १२० ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकणारे हे तिसरे वादळ आहे.

दक्षिण-पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अकवान' वादळ ताशी तीन किलोमीटर वेगाने उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने भारतीय भूभागाच्या दिशेने सरकत आहे. मंगळवारी हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला समुद्रात सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर होते. तसेच आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि विशाखापट्टणमच्या दक्षिण-पूर्वेला ६५० किलोमीटर, तर ओदिशातील गोपाळपूरपासून सुमारे ७४० किलोमीटर अंतरावर त्याचे केंद्र होते.

वादळाचा प्रवास उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेने सुरू असून, १९ नोव्हेंबरपर्यंत त्याचे अतितीव्र वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर ते विशाखापट्टणमदरम्यानच्या किनारपट्टीवर २० नोव्हेंबरच्या रात्री हे वादळ धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका कायम असून, अनेक भागांत थंड हवामानाचा अनुभव येत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील वादळाच्या प्रभावामुळे २१ नोव्हेंबर रोजी विदर्भातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पावसामुळे विदर्भातील तापमानात बदल होऊन थंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात पुढील काही दिवसांत बदल जाणवण्याचा अंदाज आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाज ठप्प; संपात राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी

भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती

दुष्काळाचे संकट गडद; आणखी चार तालुक्यांत दुष्काळ घोषित, राज्यात अन्य तालुक्यांचेही ग्राऊंड सर्वेक्षण होणार