बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मंगळवारी (दि.१६) उघडकीस आली आहे. दहावीतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका सरकारी शाळेच्या शिक्षकाला संतप्त पालकांनी शाळेच्या आवारातच चोप दिला. 'परीक्षेत पास करून देतो' असे आमिष दाखवत त्याने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीशैल कुंबार हे सरकारी उर्दू हायस्कूलमध्ये कन्नड विषयाचे शिक्षक आहेत. दहावीतील विद्यार्थिनींना विषयात उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवत त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. वर्गखोलीत तसेच शाळेच्या स्वच्छतागृह परिसरातही त्यांनी विद्यार्थिनींचा छळ केल्याचा दावा काही विद्यार्थिनींनी केला आहे.
पाचपेक्षा अधिक विद्यार्थिनींचे आरोप
पाचपेक्षा जास्त विद्यार्थिनींना अशाच प्रकारच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारला. यावेळी शाब्दिक वाद झाल्यानंतर पालकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शिक्षकाला मारहाण केली. त्यामुळे शाळेच्या परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आपली चूक अंशतः मान्य करत पालकांची माफी मागितल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले असून विद्यार्थिनी, पालक आणि शाळा प्रशासनाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करण्यात येत असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.