बंगळुरू : हॉटेलमध्ये मुक्कामाला गेल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद अनेकजण घेतात. मात्र, बंगळुरूतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये उतरलेल्या दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा मृत्यू विजेचा धक्का लागल्यामुळे झाल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी दोघांनाही दुखापत झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
बंगळुरूतील कॉनराड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये दोन परदेशी नागरिक उतरले होते. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत स्लोव्हाकियाचे नागरिक जुराज होर्वात (४५) आणि जर्मनीचे नागरिक अलेक्झांडर मॅक्सिमिलियन थाइस (५९) यांचा मृत्यू झाला. पोलिस उपायुक्तांनीही या घटनेला दुजोरा दिला असून, मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
वाचवण्यासाठी धावलेले दोघेही जखमी
दोन्ही परदेशी नागरिक अडचणीत सापडल्याचे लक्षात येताच त्यांना वाचवण्यासाठी आणखी दोन जण पुढे आले. यामध्ये हॉटेलमध्ये मुक्कामी असलेला एक अमेरिकन नागरिक आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मात्र, बचावाच्या प्रयत्नात हे दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, दोघांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हॉटेल व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप
या दुर्घटनेनंतर मृतांपैकी एका व्यक्तीच्या पत्नीने हॉटेल व्यवस्थापनाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हॉटेलच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
स्विमिंग पूलमध्ये विजेचा प्रवाह कसा आला?
स्विमिंग पूलमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता का, याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यासाठी पूल परिसरातील विद्युत यंत्रणा आणि इतर उपकरणांची तपासणी केली जाणार आहे. तसेच दोघांना वाचवण्यासाठी गेलेले नागरिक नेमके कसे जखमी झाले, याचीही चौकशी सुरू आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही परदेशी नागरिकांचे मृतदेह मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हॉटेलमधील स्विमिंग पूलच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, विजेचा धक्का नेमका कशामुळे बसला आणि या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.