नवी दिल्ली : बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस या मार्गावरील सर्वाधिक वेगवान रेल्वे ठरणार आहे. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा दिल्या तरी या गाडीचे भाडे मात्र या मार्गावर धावणाऱ्या अन्य रेल्वेगाड्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. वंदे भारत स्लीपरच्या एसी थ्री टियरचे भाडे अन्य गाड्यांच्या तुलनेत ६० ते ९६ टक्क्यांनी अधिक आहे. त्याचप्रमाणे एसी टू टियरचे भाडे ६५ ते ७८ टक्क्यांनी, तर एसी फर्स्ट क्लासचे भाडे २० ते ३० टक्क्यांनी जास्त आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू आणि मुंबईदरम्यानचे १,१०० किलोमीटरहून अधिक अंतर पार करण्यासाठी अन्य रेल्वेगाड्यांना जवळपास २२ तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. मात्र, वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस हे अंतर अवघ्या १६ तास १० मिनिटांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे जवळपास सहा तास वाचणार आहेत.
बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसचे एसी थ्री टियरचे भाडे २,८१० रुपये, एसी टू टियरचे ३,६३० रुपये, तर एसी फर्स्ट क्लासचे भाडे ४,४५० रुपये आहे.
वंदे भारत स्लीपरनंतर या मार्गावरील वेगवान गाड्यांमध्ये कोईम्बतूर-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसचा (गाडी क्रमांक ११०१४) समावेश होतो. या गाडीला बंगळुरूहून मुंबईला पोहोचण्यासाठी सुमारे २१ तास ५५ मिनिटे लागतात. तिचे एसी थ्री टियर, एसी टू टियर आणि एसी फर्स्ट क्लासचे भाडे अनुक्रमे १,४३५ रुपये, २,०४५ रुपये आणि ३,४२५ रुपये आहे.
अजमेर एक्स्प्रेसलाही जवळपास तेवढेच अंतर पार करण्यासाठी सुमारे २२ तास लागतात. या गाडीचे एसी थ्री टियरचे भाडे १,५१० रुपये, एसी टू टियरचे २,१५५ रुपये आणि एसी फर्स्ट क्लासचे ३,६१० रुपये आहे. प्रीमियम श्रेणीतील हमसफर एक्स्प्रेसच्या तुलनेतही वंदे भारत स्लीपरचे एसी थ्री टियरचे भाडे जवळपास ६३ टक्क्यांनी अधिक आहे. हमसफर एक्स्प्रेसचे एसी थ्री टियरचे भाडे १,७२५ रुपये असताना वंदे भारत स्लीपरसाठी २,८१० रुपये मोजावे लागणार आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई आणि बेंगळुरू तसेच या शहरांजवळील स्थानकांदरम्यान सुमारे २२ रेल्वेगाड्या धावतात.
विविध रेल्वेगाड्यांच्या अधिक भाड्याचे समर्थन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत केले होते. प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांनुसार भाडे निश्चित केले जाते. तसेच भारतीय रेल्वे प्रवाशांच्या विविध श्रेणींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देते, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या नव्या सेवेमुळे प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास रात्रीच्या वेळी करण्याचा आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. रात्री प्रवास करून दुसऱ्या दिवशी आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे शक्य होईल, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
या गाडीला अनंतपूर, गुंतकल, रायचूर, यादगीर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच या प्रदेशांतील महत्त्वाची व्यापारी, शैक्षणिक आणि प्रादेशिक केंद्रे जोडली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
आठवड्यातून सहा दिवस धावणार
गाडी बंगळुरूतील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल (एसएमव्हीटी) येथून रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सीएसएमटी येथून रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता एसएमव्हीटी बंगळुरू येथे पोहोचेल. ही रेल्वेसेवा आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात येणार आहे. बंगळुरूहून सुटणारी गाडी दर सोमवारी, तर मुंबईहून सुटणारी गाडी दर मंगळवारी धावणार नाही.