बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी 
राष्ट्रीय

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

बेंगळुरूमधील दगड खाणीत ग्रॅनाइटचा प्रचंड खडक कोसळून ८ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांश मजूर बिहारमधील असून, बेकायदा खाणकाम आणि सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांमुळे तपास सुरू करण्यात आला आहे.

Mayuri Gawade

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे गुरुवारी (दि. २) सकाळी अत्यंत भीषण दुर्घटना घडली. बंगळुरू दक्षिण तालुक्यातील माडपट्टणा परिसरातील दगड खाणीत ग्रॅनाइटचा भलामोठा खडक कोसळल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांश मजूर बिहारचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्याचे काम सुरू केले.

४० फूट उंचीवरून कोसळला प्रचंड खडक

पीटीआयच्या वृत्तानुसार, गुरुवारी पहाटे माडपट्टणा येथील दगड खाणीत मजूर नेहमीप्रमाणे उत्खननाचे काम करत होते. त्याचवेळी सुमारे ४० फूट उंचीवरून ग्रॅनाइटचा मोठा खडक खाली कोसळला. या खडकाखाली अनेक मजूर दबले गेले. घटनास्थळीच सात जणांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एका मजुराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाहनेही चक्काचूर

दुर्घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की, खडक कोसळल्यानंतर तेथे उभी असलेली दगड वाहून नेणारी वाहने पूर्णपणे चिरडली गेली. एका ट्रॅक्टरचेही तुकडे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अनेक मजूर जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांनी सांगितले. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

१८ मजूर कामावर होते

घटनास्थळी काम करणाऱ्या एका मजुराने सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी बिहार आणि उत्तर कर्नाटकातील सुमारे १८ मजूर खाणीत काम करत होते. त्यापैकी अनेक जण खडकाखाली अडकले होते.

मुख्यमंत्र्यांकडून शोक; कारवाईचे आश्वासन

या दुर्घटनेबद्दल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शोक व्यक्त केला. खाण मालकांनी कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाणींवर सरकार योग्य ती कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेकायदा उत्खननाचा आरोप

यशवंतपूरचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनी या दुर्घटनेमागे बेकायदा उत्खनन असल्याचा आरोप केला. अनेक वर्षांपासून या परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. काही काळापूर्वी याच परिसरात स्फोटांमुळे एका बिबट्याचाही मृत्यू झाला होता, असा दावाही त्यांनी केला. तसेच या अवैध उत्खननात पोलीस, वन विभाग आणि खाण विभागातील काही अधिकारीही सहभागी असल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणातील दोषी सुटू नयेत, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.

दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू

घटनास्थळ सील करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खडक नेमका कशामुळे कोसळला, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले होते का आणि या दुर्घटनेत निष्काळजीपणा झाला का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत मजुरांच्या नातेवाईकांना माहिती देण्याचे कामही प्रशासनाकडून सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी

व्यावसायिक एलपीजी १८३ रुपयांनी कमी, पुरवठाही सुरळीत

Ulhasnagar : पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या आजीबाईंची अग्निशमन दलाकडून सुटका