बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. राज्यातील एकूण २४३ जागांसाठीची मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पण त्या आधी पहिला एक्झिट पोल जाहीर करण्यात आला आहे. मॅट्रिझ-IANS च्या पहिल्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी NDA ला १४७ ते १६७ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महागठबंधनला ७० ते ९० जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
एनडीएची सत्ता
एक्झिट पोलमध्ये NDA ला ४८ टक्के, महागठबंधनला ३७ टक्के आणि इतर पक्षांना १५ टक्के मत मिळाल्याचे दिसून आले आहे. या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१,३०२ उमेदवार रिंगणात
या मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी पार पडला. ज्यामध्ये १२१ जागांसाठी ६४.६६ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी १२२ जागांसाठी घेण्यात आले आणि संध्याकाळी ६ वाजता मतदान पूर्ण झाले. या निवडणुकीसाठी १,३०२ उमेदवार रिंगणात होते.
NDA मध्ये जागा
सत्ताधारी NDA मध्ये जनता दल (युनायटेड), भारतीय जनता पक्ष, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि इतर प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. BJP आणि JDU ला प्रत्येकी १०१ जागा, LJP (रामविलास) २९, राष्ट्रीय लोक मोर्चाला (RALOMO) ६ आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाला (HAM) ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
महागठबंधनामध्ये जागा
महागठबंधनात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, विकासशील इंसान पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षांचा समावेश आहे. RJD ला १४३, काँग्रेसला ६१, CPI (ML) ला २० आणि VIP ला १२ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, जनसुराज्य पक्षाला ०-२ आणि एआयएमआयएमला २-३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
मागील निवडणुकीत RJD आघडीवर
मागील निवडणुकीत, RJD ला ७५ जागांवर विजय मिळवून तो सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपला ७४ जागांवर, तर JDU ला ४३ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
एक्झिट पोलनुसार NDA ला आघाडी दिसून आली असली तरी अंतिम निकाल मतमोजणीनंतरच निश्चित होतील. १४ नोव्हेंबर रोजी कोणाच्या पदरात जनतेचा कौल लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.