भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढणार 
राष्ट्रीय

भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढणार; बिहार निवडणुकीसाठी रालोआचे जागावाटप जाहीर

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) विरोधकांवर आक्रमक झाली आहे. भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उभे करतील, तर चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष २९ जागांवर उमेदवार देणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) आपले जागावाटप जाहीर करून विरोधकांवर कुरघोडी केली आहे. भाजप आणि जेडीयू (जनता दल संयुक्त) प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उभे करतील, तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष २९ जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा बिहार निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केली.

भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक झाली. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेते सहभागी होते. ही बैठक सुरू असतानाच, धर्मेंद्र प्रधान यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा या दोन्ही पक्षांना प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत.

रालोआच्या जागावाटपाची माहिती पत्रकार परिषदेत नव्हे तर रालोआच्या नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून करण्यात आली. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान व बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायस्वाल यांच्यासहित अन्य नेत्यांनी रविवारी ‘एक्स’वरून जागावाटपाचे आकडे जाहीर केले.

आता जागावाटपानंतर घटक पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. भाजपच्या उमेदवारांची नावे जवळपास अंतिम झाली आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या उमेदवारांची यादीही अंतिम झाली आहे. लोजपाने (रामविलास) काल सांगितले की, रालोआच्या जागांचे वाटप झाल्यानंतर चिराग पासवान हे उमेदवारांची यादी जाहीर करतील.

पासवान, मांझी आणि कुशवाहा यांनी चर्चेत कडवी भूमिका घेतली होती आणि त्यांनी भाजपकडून अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळवण्यात यश मिळवले, असे दिसून येते.

२४३ सदस्यीय बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे. ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

२०२० मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयूने ११५ जागांवर आणि भाजपने ११० जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान हे स्वतंत्रपणे लढले होते.

यावेळी मात्र पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजप समान संख्येने प्रत्येकी १०१ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. यावरून सत्तारूढ आघाडीतील सामर्थ्यसंतुलनातील बदल स्पष्ट दिसतो.

प्रधान म्हणाले, ‘रालोआतील सर्व घटक पक्षांनी परस्पर सहमतीने जागावाटप पूर्ण केले आहे. सर्व रालोआचे नेते व कार्यकर्ते याचे आनंदाने स्वागत करत आहेत. बिहार पुन्हा एका रालोआ सरकारसाठी तयार आहे.’

कोणी छोटा, मोठा भाऊ नाही!

नितीश कुमार यांचा पक्ष भाजपपेक्षा एक अधिक जागा आपल्याकडे ठेवेल, असा अंदाज होता. पण, दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढवण्याचे ठरवले. या युतीत कोणीही छोटा किंवा मोठा भाऊ नाही, असा संदेश या दोन्ही पक्षांनी दिला.

जागावाटप

  • जदयू -१०१

  • भाजप -१०१

  • एलजेपीआर -२९

  • एचएएम -६

  • आरएलएम -६

मुंबईकरांनो लक्ष द्या! पांजरापूर पंपिंग स्टेशनमध्ये ‘तांत्रिक बिघाड’; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का; IRCTC घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित, RJD समोर दुहेरी संकट

ऐन दिवाळीत सोने दरात अस्थिरता; सणासुदीतील मागणी, अमेरिकेतील महागाईचा मौल्यवान धातूवर होणार परिणाम

दिवाळीचा लाँग वीकेंड पर्यटकांच्या पथ्यावर; हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल सर्व्हिस क्षेत्राला मोठी मागणी