पाटणा : बिहारमधील नद्यांना आलेल्या महापुरामुळे तब्बल १३ जिल्ह्यांतील सुमारे २७ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोमवारी वैशाली आणि भागलपूर येथील कम्युनिटी किचनला (सामूहिक स्वयंपाकघर) भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना तात्काळ मदत व बचाव कार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सध्या १९० कम्युनिटी किचन चालवले जात असून, मदत व सुटकेसाठी १४२९ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी यांनी पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या अन्नछत्रांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी स्थानिक प्रशासनाला नदीच्या बंधाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि संवेदनशील भागात खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले.
गंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाटण्यातील गांधी घाट आणि हाथीदह येथे गंगा नदीने आतापर्यंतच्या सर्वात उच्च पातळीला स्पर्श केल्याने खालील सखल भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या फुगल्याने १३ जिल्ह्यांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत राज्यात ६९.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सामान्य पावसापेक्षा ५५ टक्क्यांनी जास्त आहे. अभियंत्यांना आपत्कालीन परिस्थितीत यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना नद्यांजवळ न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
धोक्याच्या चिन्हावर
पाटण्यातील गांधी घाट येथे सोमवारी सकाळी ६ वाजता गंगा नदी ५०.४१ मीटरवर वाहत होती, जी धोक्याच्या पातळीपेक्षा १.५७ मीटर अधिक आहे. याशिवाय हाथीदह, भागलपूर, कहलगाव, बक्सर आणि मुंगेर येथेही गंगेची पातळी धोक्याच्या वर आहे. गंडक (दुमरियाघाट व हाजीपूर), कोसी (बलतारा व कुरसेला), बुढी गंडक (खगरिया), पुनपुन (श्रीपालपूर), बागमती (बेनिबाद) आणि घाघरा (दरौली) या नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.