बिहार : एका गावातून दुसऱ्या गावात श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या मुलांचा प्रवास अखेरचा ठरला. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात मंगळवारी (दि. १३) रात्री गंगा नदीत प्रवाशांनी खचाखच भरलेली नाव उलटून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात किमान १३ मुलांचा मृत्यू झाला असून, मृत मुलांचं वय १५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी मृत मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा परिसरातील रामपूर श्यामचंद गावाजवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २० जणांना घेऊन एक नाव गंगा नदीतून जात होती. शेजारच्या गावात श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी ही मुलं निघाली होती.
नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान अचानक नाव उलटली आणि त्यातील प्रवासी नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
सात जणांची सुटका
दुर्घटनेनंतर एसडीआरएफने गंगा नदीत शोध आणि बचावकार्य सुरू केलं. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने नदीत पडलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात आला.
वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात जणांना वाचवण्यात यश आलं असून, त्यांना नालंदा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुधवारीही नदीत शोधमोहीम सुरू होती. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
"वैशाली येथे नाव उलटून झालेली जीवितहानी अत्यंत वेदनादायी आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला.
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे मृतांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून प्रत्येकी ६ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याबाबत आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित नाव सरकारी असून तिची अवस्था खराब होती, असा दावाही काही ग्रामस्थांनी केला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवण्यात आलं असून, दुर्घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणं बाकी आहे.