गुजरातमधील वडोदरा येथील हरनी मोतनाथ तलावात गुरुवारी दुपारच्या सुमारास एक बोट उलटून मोठी दूर्घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, या बोटीतून 24 विद्यार्थी आणि चार शिक्षक प्रवास करत होते. त्यापैकी 13 मुलांसह 2 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित 10 मुले आणि 2 शिक्षकांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फक्त 16 प्रवाशांची होती क्षमता, लाईफ जॅकेटही नव्हते -
या अपघातात बळी पडलेली सर्व मुले वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील आहेत. धक्कायादक म्हणजे या बोटीमधून प्रवास करणाऱ्या कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. यामुळे बोट उलटल्यावर सर्वजण पाण्यात बुडाले. वडोदराचे जिल्हाधिकारी एबी गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोटीची क्षमता 16 प्रवाशांची होती, मात्र त्यात 27 प्रवासी प्रवास करत होते.
बोट उलटण्याचे कारण माहित नाही -
घटनास्थळी विद्यार्थ्यांचे आई-वडील पोहोचण्यास सुरूवात झाली असून त्यांचा आक्रोश सुरू आहे. रस्सीच्या सहाय्याने बोट खेचून किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. वडोदराचे उपमहापौर चिराग बारोट यांनी सांगितले की, मुले तलावात जात असताना बोट उलटली. याशिवाय मला दुसरे काही माहीत नाही.
निष्काळजीपणामुळे घडली घटना -
निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. लहान मुलांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी आणले असावे. कंत्राटदार आणि कॉर्पोरेशन जबाबदार आहेत. तिथे केव्हा अपघात झाला ते आम्हाला कळलंही नाही. लहान मुलांकडे सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटही नसतील तर त्याला जबाबदार कोण? अशी प्रतिक्रिया गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत श्रीवास्तव यांनी दिली.
जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार -
या घटनेत कोणतीही चूक, किरकोळ असो वा मोठी, त्याचे गांभीर्य लक्षात घेतले जाईल. सध्या या मुलांना वाचवण्यास प्राधान्य दिले जात आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुलांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नसेल, तर त्याचीही चौकशी केली जाईल, असे स्थानिक आमदारांनी सांगितले.
हृदयद्रावक घटना: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले - वडोदराच्या हरनी तलावात बोट उलटल्याने मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. अपघातातील जखमींना तातडीने मदत आणि उपचार देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.