राष्ट्रीय

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात! Air India चे प्लेन लंडनसाठी टेक-ऑफ घेताच कोसळले; २४२ प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी CM रुपाणी?

विमानात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते, असे समजते. प्राथमिक वृत्तानुसार या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मोठ्या प्रमाणात जीवितहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नेहा जाधव - तांबे

गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान क्रॅश झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगरच्या रहिवाशी परिसरात हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी विमानाने टेक-ऑफ केले. त्यानंतर काहीच मिनिटांत ते कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जात होते.

वृत्तसंस्था एएनआयने राज्य पोलिस नियंत्रण कक्षाच्या हवाल्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानात २४२ जण होते. त्यापैकी २३० प्रवासी तर १२ क्रू मेंबर्स होते, असे समजते. 'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच, स्थानिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. 

आकाशात काळ्या धुराचे लोट दिसत आहेत. त्या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या देखील जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विमानांना ट्रॅक करणारी वेबसाईट फ्लाइटराडार२४ नुसार, "हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर होते, जे सेवेत असलेल्या सर्वात आधुनिक प्रवासी विमानांपैकी एक होते".

एएनआयला एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राथमिक माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले आहे. २-३ मिनिटांत पोलिस आणि इतर एजन्सी घटनास्थळी पोहोचल्या. जवळजवळ ७०-८०% परिसर रिकामा करण्यात आला आहे. सर्व एजन्सी येथे काम करत आहेत."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमान अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून केंद्र सरकारची सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, कशामुळे विमान क्रॅश झाले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा