नवी दिल्ली : लहान मुलांमध्ये 'टाईप-२' मधुमेहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे सीबीएसईने आपल्याशी संलग्न शाळांमध्ये मुलांच्या साखरयुक्त पदार्थांच्या खाण्यावर व ते प्रमाण कमी करण्यासाठी 'शुगर बोर्ड' स्थापन करण्याचे आदेश दिले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाला (सीबीएसई) आढळले की, गेल्या १० वर्षांत मुलांमध्ये 'टाईप-२'चा मधुमेह वाढला आहे. हा आजार पूर्वी मोठ्या माणसांना होत होता.
सीबीएसईने शाळेच्या प्राचार्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले की, साखर व साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मुलांमध्ये 'साखर' वाढत आहे. शाळांमध्ये गोड पदार्थ, शीतपेय, फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. साखर अधिक खाल्ल्याने केवळ मधुमेहाचा धोका वाढत नाही तर लठ्ठपणा, दातांची समस्या व चयापचय आदींचे विकार होतात. त्यामुळे लहान मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करतात व त्याचा शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो.
साखर सेवनाचे प्रमाण वाढले
संशोधनानुसार, चार ते १० वर्षांच्या मुलांमध्ये दैनंदिन कॅलरीचे सेवन १३ टक्के, तर ११ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये १५ टक्के वाढले आहे. मुलांसाठी आवश्यक असलेल्या कॅलरीपेक्षा ५ टक्के अधिक आहे. शाळेत कायम गोडपदार्थ, शीतपेय व फास्टफूड सहज उपलब्ध असते.
शाळेत 'शुगर बोर्ड' स्थापन केल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक साखर खाल्ल्याच्या दुष्परिणामांची माहिती दिली जाणार आहे. या बोर्डानी रोज साखरेचे सेवन किती करावे ? आरोग्याला निर्माण होणारा धोका, आरोग्यपुरक आहार आदींची माहिती द्यायची आहे. हे बोर्ड विद्यार्थ्यांना चांगल्या खाद्यपदार्थांबाबत माहिती देईल. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य अधिक लाभदायक होऊ शकेल.