नवी दिल्ली : कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार दोन्ही राज्यांमध्ये पथके पाठवणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी सांगितले.
आगामी रब्बी (हिवाळी) हंगामाच्या तयारीवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना चौहान म्हणाले की, हवामान बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत आणि नुकत्याच संपलेल्या खरीप (उन्हाळी/पावसाळी) हंगामावर त्याचा प्रभाव जाणवला आहे.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही ३ ऑक्टोबर रोजी कर्नाटकात एक केंद्रीय पथक पाठवू. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे, त्यांनीही चिंता व्यक्त केली आहे, आणि आम्ही तेथेही केंद्रीय पथक पाठवू. या संकटाचा सामना करणाऱ्या राज्यांना मी माझ्या टीमसह वैयक्तिकरीत्या भेट देईन, असे ते म्हणाले.
कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्राने साधारणपणे दोन-तृतीयांश भागात दुष्काळ जाहीर केला आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. चौहान यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अधिकाऱ्यांसह सर्व राज्य अधिकाऱ्यांना या भागातील खरीप पिकांच्या धोक्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.