नवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या मनामध्ये या हल्ल्याचा सूड घेण्याचा विचार आला होता. मात्र हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारवर अमेरिकेचा दबाव होता. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचे टाळले, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. परदेशी दबावामुळे हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला, असे भाजपने म्हटले आहे.
या हल्ल्यामुळे भारत हादरला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन यूपीए सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव होता आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे टाळले. माझ्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याचा विचार होता, परंतु सरकारने सैन्य कारवाई न करण्याचा निर्णय घेतला, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
जागतिक संघटनांचा प्रभाव
या मुलाखतीत पी. चिदंबरम म्हणाले की, मुंबईतील हल्ल्यानंतर काही दिवसांतच मी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. या हल्ल्यात १७५ हून अधिक लोकांचा जीव गेला होता. जगातील अनेक देशांतील अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत युद्ध सुरू करू नका, असे म्हटले होते. त्यावेळी कोंडोलीजा राइस अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री होत्या, त्यांनी माझी आणि पंतप्रधानांची भेट घेतली आणि प्रत्युत्तर देऊ नका असे सांगितले. मात्र हा निर्णय सरकार घेईल, असे मी तेव्हा म्हटले. आपल्याला बदला घ्यायला हवा असा विचार माझ्या मनात होता. त्यानंतर पुढे पंतप्रधान आणि इतर लोकांशीही संभाव्य कारवाईबाबत चर्चा केली होती, असे चिदंबरम म्हणाले. जेव्हा हल्ला सुरू होता, तेव्हाही पंतप्रधानांनी त्यावर चर्चा केली होती. त्यानंतर जो निर्णय झाला त्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि जागतिक संघटनांचा प्रभाव दिसून येत होता.
भाजपचा काँग्रेसवर पलटवार
दरम्यान, चिदंबरम यांच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर परदेशी दबावामुळे चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले गेले हे देशातील जनता जाणते, आता माजी गृहमंत्र्यांनी १७ वर्षांनी त्याचा स्वीकार केला, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. तर चिदंबरम मुंबई हल्ल्यानंतर गृहमंत्रीपद सांभाळण्यासाठी तयार नव्हते. त्यांना पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करायची होती. परंतु त्यांच्यावर दबाव होता, असा आरोप भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला.