चिनी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंटने फ्लिपकार्टमधील सहसंस्थापक बिनी बन्सल यांच्याकडील हिस्सा २६४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स अर्थात २,०६० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हा व्यवहार युरोपियन उपकंपनीमार्फत झाल्याचे अधिकृत कागदपत्रांवरुन दिसते.
सिंगापूरस्थित ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे भारतात कामकाज सुरु आहे. टेनसेंट क्लाऊड युरोप बीव्ही या कंपनीला आपल्याकडील काही हिस्सा विकून सुद्धा बन्सल यांच्याकडे फ्लिपकार्टमधील १.८४ टक्के हिस्सा राहिला आहे. हा व्यवहार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळात यासंदर्भातील माहिती भारत सरकारला देण्यात आली. या व्यवहारानंतर टेन्सेंट कंपनीकडे फ्लिपकार्टमधील ०.७२ टक्का हिस्सा आला असून त्याचे मूल्य २६४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. जुलै २०२१मधील या कंपनीच्या ३७.६अब्ज अमेरिकन डॉलर्स बाजारमूल्यानुसार वरील व्यवहाराचे मूल्य ठरविण्यात आले आहे.