नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या धसास लावण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी जंतरमंतरवर एक महामोर्चा आणि आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने कडक पावले उचलत नाकेबंदी केली आहे. प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करतानाच दिल्ली पोलिसांनी रात्रीपासूनच मेट्रो सेवा बंद केली आहे, तर रेल्वे प्रशासनाने दिल्लीत येणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रशासन आणि सरकारला फटकारले असून सर्व काही ठप्प करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे तर केंद्र सरकार जेन-झीला घाबरले असून देशात आणीबाणी लागू केली आहे, असा आरोप सीजेपीने केला असून तरुणांची इतकी भीती वाटत असेल तर संपूर्ण देशच बंद करा, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे उद्या जंतरमंतरवर काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जंतरमंतरवर आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिल्ली परिमंडळाच्या सहआयुक्त (पोलीस) नुपूर प्रसाद यांनी सांगितले की, आंदोलनाचा अर्ज उशिरा सादर करणे आणि यापूर्वीच्या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. यापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याची परवानगी दिली असताना त्यांनी कायदेशीर निर्देश किंवा स्वतःच्या हमीपत्राचे पालन केले नव्हते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी परवानगी दिली गेलेली नाही. तसेच, नवी दिल्ली परिसरात सध्या 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' कलम १६३ लागू असून, याचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मेट्रोची ५७ स्थानके बंद
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कडक पावले उचलण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९ वाजेपासून शनिवारपर्यंत तब्बल ५७ मेट्रो स्थानके बंद ठेवण्यास सांगितले आहे.
मद्यविक्री बंद
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ९ आणि १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिल्लीतील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमांवर कडक नजर ठेवण्यात आली असून अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
इंटरनेट सेवा बंद
दिल्लीतील जंतरमंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजल्यापासून १० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जंतरमंतरच्या ४ किलोमीटर परिघात मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित केली जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, दिल्लीच्या इतर भागांमधील इंटरनेट सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई-दिल्ली दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द
मध्य आणि पश्चिम रेल्वेने शुक्रवारी मुंबईहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत किंवा त्यांच्या वेळेत बदल केला आहे. वेळ बदललेल्या गाड्या (पश्चिम रेल्वे) मुंबई सेंट्रल - न्यू दिल्ली राजधानी एक्सप्रेस (१२९५१): ५ तास उशिराने सुटणार.मुंबई सेंट्रल - हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस (१२९५३): ५ तास उशिराने सुटणार. रद्द केलेल्या गाड्या- बांद्रा टर्मिनस - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१२२४७) (पश्चिम रेल्वे)मुंबई सेंट्रल - हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस (पश्चिम रेल्वे)डॉ. आंबेडकर नगर - न्यू दिल्ली एक्सप्रेस (२०१५५) (पश्चिम रेल्वे)इंदूर - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (०९३०९) (पश्चिम रेल्वे)इंदूर - न्यू दिल्ली एक्सप्रेस (१२४१५) (पश्चिम रेल्वे)साबरमती - न्यू दिल्ली एक्सप्रेस (१२९५७) (पश्चिम रेल्वे)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (२२२२१) (मध्य रेल्वे)
दिल्लीमध्ये अभूतपूर्व सुरक्षा; २५ हजार जवान तैनात
दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून संपूर्ण शहरात कडक पहारा बसवण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नवी दिल्ली जिल्ह्याचे २० परिमंडळात विभाजन केले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमण्याची शक्यता पाहता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात २५,००० पोलीस व निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानके, बस स्थानके, हॉटेल्स आणि संवेदनशील ठिकाणांवर कसून तपासणी सुरू आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १२१ हून अधिक कंपन्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी अनेक भागांत मॉकड्रिलही केले आहेत. राजीव चौक, न्यू दिल्ली, सेंट्रल सेक्रेटरिएट, पटेल चौक, काश्मिरी गेटसह एकूण ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश व निर्गमद्वार शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. शनिवार, १० ऑक्टोबर रोजीही बहुतांश स्थानकांवर निर्बंध कायम राहतील आणि न्यू दिल्ली स्थानक वगळता इतर स्थानकांवर इंटरचेंज सुविधा सुरू राहील.