नवी दिल्ली : या आंदोलनापूर्वीच राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून वाहतूक नेटवर्क बंद करण्यात आले आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सीजेपीच्या नेत्यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि केंद्र सरकार जेन-झीला घाबरत असल्यानेच त्यांनी आणीबाणी लागू केली आहे, असा गंभीर आरोप केला. जर तुम्हाला तरुणांची इतकीच भीती वाटते, तर संपूर्ण देशच बंद करून टाका, असे सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले. सरकारच्या या पूर्वतयारीच्या कारवाईवर ताशेरे ओढत अभिजित दिपके यांनी हालचालींवर निर्बंध लादल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध केला बंगळुरूहून परतल्यानंतर शुक्रवारी मुंबई विमानतळावर दिपके यांनी, सीजेपीचे कार्यकर्ते शनिवारी जंतरमंतरवर ठरल्यानुसार आंदोलन करणारच, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
देशच बंद करा
जर तुम्हाला तरुणांची इतकीच भीती वाटते, तर संपूर्ण देशच बंद करून टाका, असे आव्हान दिपके यांनी दिले. दिपके म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार 'जेन झी' ला भीत असून त्यांनी हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी, दरम्यान, सीजेपीचे दुसरे नेते सौरभ दास यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीची तुलना आणीबाणीशी केली. भाजपशासित राज्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात असून काहींना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. "कोणत्याही भ्रमात राहू नका. देशात आणीबाणी लागू करण्यात आली असून दिल्लीचे एका लष्करी छावणीत (किल्ला) रूपांतर झाले आहे, असे दास म्हणाले.
जंतरमंतरला पर्याय शोधा : सुप्रीम कोर्टाचे निर्देश
दिल्लीतील जंतरमंतर येथील निदर्शनांच्या सद्यस्थितीवर विचार करून आंदोलनासाठी इतर योग्य पर्यायी जागा निश्चित करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले आहेत. राजधानीत शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांसाठी मूलभूत सुविधांनी सुसज्ज असलेली जागा असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे.