नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर-मंतर येथे आयोजित केलेल्या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (दि. १०) रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह पक्षाचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातच ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.
'आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत'
विमानात ताब्यात घेतले जात असताना अभिजीत दिपके यांनी वारंवार पुरुष पोलिस अधिकाऱ्यांना पुढे येण्याची मागणी केली. "कृपया पुरुष पोलिस अधिकाऱ्यांना पुढे पाठवा," असे ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. तसेच, "या, अटक करा. आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत," असे म्हणत त्यांनी पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिले आणि आपल्याला कोणत्या कारणावरून ताब्यात घेतले जात आहे, असा सवाल उपस्थित केला. यावेळी विमानात "भारत माता की जय" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांची भीती वाटत नसल्याचे सांगत दिपके यांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. व्हिडीओच्या शेवटी महिला पोलिस अधिकारी जवळ येताच त्यांनी "हॅलो मॅडम" असे म्हटले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी दिल्लीला जात असताना अटकेला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे अभिजीत दिपके यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आंदोलनात नागरिकांनी सहभागी होऊ नये, यासाठी सुरक्षाविषयक निर्बंधांचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीला आज सकाळी सुमारे ७.४५ वाजता दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुग्राममधील सेक्टर ५६ येथील सेंट्रल पार्क विहार परिसरातील त्याच्या राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आली.
दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विविध भागांत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत किमान ६०० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून वाहतुकीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संवेदनशील ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत.
आंदोलनस्थळाच्या परिसरात वाहनांची तपासणी करण्यात येत असून, महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कॅनॉट प्लेस, मंडी हाऊस, जंतर-मंतर, पटेल चौक आणि मध्य दिल्लीतील अन्य प्रमुख भागांत वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता दिल्ली वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिस्थितीनुसार वाहतूक वळवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
मेट्रो, रेल्वे आणि मोबाइल इंटरनेटवर निर्बंध
राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवांवर निर्बंध घालण्याबाबत पावले उचलण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी ५७ मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारे आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्याबाबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (DMRC) विनंती केली होती. तसेच, काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, राजधानीतील काही भागांत मोबाइल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्याची माहिती आहे.
वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार, अशोका रोड-जंतर-मंतर रोड गोलचक्कर, टॉलस्टॉय मार्ग-जनपथ चौक, जयसिंग रोड-संसद मार्ग चौक, रेल भवन गोलचक्कर, पटेल चौक, गोल डाक खाना आणि विंडसर प्लेस या भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना वाहतूकविषयक सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारली
कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि स्थानिक रहिवाशांना होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पक्षाला पाठवलेल्या पत्रात आंदोलनाबाबत दिलेली सूचना ही नियमानुसार परवानगी मिळवण्यासाठी सादर केलेला अर्ज मानता येणार नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जंतर-मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यासाठी किमान १० दिवस आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय, यापूर्वीच्या आंदोलनांदरम्यान निर्धारित वेळ संपल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याच्या घटना घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या कथित नियमभंगांचाही परवानगी नाकारण्याच्या निर्णयात विचार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारले आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या मुद्द्यावरून आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, त्याच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.