नवी दिल्ली : कॉकराेच जनता पार्टीच्या नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क येथे 'लहरा दो तिरंगा' आंदोलन पुकारण्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली. हे आंदोलन रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सेंट्रल पार्कवर काढण्यात येणाऱ्या 'लहरा दो तिरंगा' मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कॉनॉट प्लेस येथील प्रसिद्ध सेंट्रल पार्क प्रशासकीय कारणांमुळे १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय न्यू दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलने घेतला आहे.
सणासुदीच्या या वीकेंडला (दसरा) आंदोलनामुळे बाजारपेठा बंद ठेवाव्या लागल्यास व्यापारी व विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येईल. कॉनॉट प्लेस हे आंदोलनाचे अधिकृत ठिकाण नाही, त्यामुळे हे आंदोलन रोखले जावे, अशी मागणी येथील दुकानदारांच्या वतीने करण्यात आली होती.
मात्र सीजेपीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधीच योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत, पोलीस आपले कर्तव्य चोख बजावतील आणि याचिकाकर्त्याची कोणतीही गैरसोय किंवा नुकसान होणार नाही, असे आश्वासन अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी दिले.