CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सीजेपीच्या नेत्यांनी रविवारी व्यक्त केला.

Swapnil S

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सीजेपीच्या नेत्यांनी रविवारी व्यक्त केला. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यावर देशभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रतिबंधात्मक कोठडीतून सुटका झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. दरम्यान, राजधानीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम असताना आणखी शंभर जणांना ताब्यात घेण्यात आले.

सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची २४ तासांनी सुटका करण्यात आली. मात्र, वर्षभर शांतता भंग करणार नाही, या अटीवर त्यांची सुटका झाल्याचा दावा पोलिसांनी केला. आपली कोठडी बेकायदेशीर होती आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे या नेत्यांनी सांगितले.

‘इंडिया’ आघाडीकडून सोमवारी आणखी एका मोर्च्याचे आयोजन करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, त्यांनी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश यांच्याकडे सोमवारी दुपारी चार ते पाच या वेळेत भेटीची मागणी केली आहे.

आजीच्या निधनानंतर दीपके मूळ गावी

रांका यांनी सांगितले की, अभिजीत दीपके कोठडीत असतानाच त्यांच्या आजीचे निधन झाले. या वृत्ताची माहिती देताना अधिकाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला. सुटकेनंतर दीपके आपल्या मूळ गावी रवाना झाले; मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचे रांका यांनी स्पष्ट केले.

चांगले वागण्याच्या अटीवर सुटका : दिल्ली पोलीस

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतता आणि चांगले वर्तन राखण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीकरिता ५० हजार रुपयांचा जामीन व हमीपत्र सादर करण्यात आल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने तिघांची सुटका केली.

जबाबदारी निश्चित होईपर्यंत आंदोलन

‘आम्ही कुख्यात गुन्हेगार नाही. आम्ही नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी जात नव्हतो. आंदोलनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी निदर्शने केल्याने शांतता भंग होत नाही,’ असे सीजेपी नेते आशुतोष रांका यांनी सांगितले. ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला, तर ते कोणत्याही पक्षासाठी चांगले नाही. जबाबदारी निश्चित होईपर्यंत संपूर्ण देशात आंदोलने होतील, असेही त्यांनी सांगितले. ‘सीजेपी’ आणि विरोधी पक्षांनी या कारवाईला बेकायदेशीर ठरवले.

जंतरमंतरकडे निघालेले समर्थक ताब्यात

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा) आणि क्रांतिकारी युवा संघटना (केवायएस) यांच्यासह विविध विद्यार्थी संघटनांचे सदस्य तसेच सीजेपीचे समर्थक राजधानीतील वेगवेगळ्या भागांतून जंतरमंतरकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) राज्यसभेचे खासदार जॉन ब्रिटास यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आंदोलन न करण्याचे हमीपत्र दिलेले नाही - दीपके

नागपूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन करणार नाही, असे कोणतेही हमीपत्र आपण किंवा सीजेपीच्या अन्य नेत्यांनी दिलेले नाही, असे पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी स्पष्ट केले. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही घाबरत नाही, असे दीपके यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी हिंगोलीला रवाना झाले. ‘मला शंभर वेळा तुरुंगात टाका. तुमच्या हुकूमशाहीला आम्ही घाबरत नाही. ही हुकूमशाही आम्ही संपवू,’ असा इशाराही दीपके यांनी दिला. दीपके यांच्या या वक्तव्याच्या काही वेळ आधी दिल्ली पोलिसांनी एक व्हिडीओ जारी केला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वातावरणातील बदल घातक ठरणार

आजचे राशिभविष्य, १२ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Navratri 2026 : उपवासासाठी बनवा चविष्ट अन् हेल्दी पदार्थ; पाहा सोप्या रेसिपी

Navratri 2026 : उपवासातही खाता येईल असा खमंग आलू पराठा; साबुदाणा आणि बटाट्यापासून बनवा सोपी रेसिपी

नवरात्रीच्या उपवासात काय खावं-काय टाळावं? तब्येत बिघडू नये म्हणून लक्षात ठेवा