नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी (दि. १०) आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अनेक राजकीय नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी अडवून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आकाशवाणी भवनाजवळ आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप असून, या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण आल्याचे चित्र आहे.
अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानाबाहेरून जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनाही साऊथ अव्हेन्यू परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डोला सेन आणि अन्य कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्यात आली.
नेहा बोरा, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषणही ताब्यात
दिल्लीतील आयएनए मार्केटजवळ आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा, सीपीआय (ML) लिबरेशनचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य, कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्वजण समर्थकांसह सफदरजंग फ्लायओव्हरच्या दिशेने कूच करत होते. यावेळी आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या नेत्यांना वेगवेगळ्या वाहनांतून नेण्यात येत असल्याची माहिती सीपीआय (ML) लिबरेशनचे नेते बालाजी यांनी दिली.
ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत, "मला ताब्यात घेतले आहे मात्र, आंदोलन थांबलेले नाही," असे म्हटले. सफदरजंग फ्लायओव्हर परिसरात लोक जमू लागले असून, शक्य असल्यास आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी रोखल्यास त्या ठिकाणीच बसून आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.
'दिल्लीचे रूपांतर खुल्या तुरुंगात'
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फेसबुकवर पोस्ट करत केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने सशस्त्र पोलीस आणि निमलष्करी दलांची मोठ्या प्रमाणावर तैनात करून राजधानीचे रूपांतर 'खुल्या तुरुंगात' केल्याचा आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्याने नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. संविधान आणि मतदानाचा अधिकार यांच्या संरक्षणासाठीचा संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीपीएमचे नेते पी. राजीव यांनीही पोलिसांच्या वाहनातून व्हिडीओ प्रसिद्ध करत कारवाईचा निषेध केला. "सीपीएमचे सर्व केंद्रीय नेते आंदोलनात सहभागी झाले होते. आम्हाला ताब्यात घेऊन तुरुंगासारख्या वाहनातून नेण्यात येत आहे. गेल्या तासाभरापासून आम्ही या वाहनातून प्रवास करत आहोत," असे ते म्हणाले. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेले हे आंदोलन अटकेनंतरही थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या इतिहासातील हे महत्त्वाचे आंदोलन असल्याचे वर्णन करत, लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी हा लढा अधिक तीव्रतेने पुढे न्यावा, असे आवाहनही राजीव यांनी केले.
मुंबईतही आंदोलकांना घेतले ताब्यात
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही निदर्शने करण्यात आली. हुतात्मा चौक परिसरात आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेच्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेताना दिसत आहेत. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनाही मुंबई पोलिसांनी वांद्रे परिसरात ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ते सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शनात सहभागी होण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने जात होते. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
१००० आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती
जंतर-मंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे १००० आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पीटीआयने दिली. कॅनॉट प्लेस, रिगल सिनेमा, मिंटो ब्रिज आणि आकाशवाणी भवन परिसरातून आंदोलकांवर कारवाई करण्यात आली. तसेच, राजधानीतील १५ पोलीस जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनाही ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.
आकाशवाणी भवनाजवळ दगडफेक, दोन पोलीस कर्मचारी जखमी
आकाशवाणी भवनाजवळील इम्तियाज अली मार्गावर आंदोलनाला हिंसक वळण आल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुपारच्या सुमारास २५ ते ३० आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलनासाठी सकाळी १०.३० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्याने आणि प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखले.
दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक
सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली परिसरात पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. नवी दिल्लीकडे जाणारे काही रस्ते बंद करण्यात आले असून, काही मेट्रो स्थानके आणि राजधानीतील दोन प्रमुख रेल्वे स्थानकेही बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. विविध ठिकाणी आंदोलकांना रोखण्यात येत असल्याने दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.