नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी आणि सीबीएसई परीक्षांमधील ढिसाळ कारभाराविरोधात प्रश्न उपस्थित करत कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीच्या पुष्ठ्यर्थ ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन केले जाणार असून, त्यासाठी आता अभिजीत दीपकेही अमेरिकेतून भारतात येत आहे. त्याने पोस्ट करत याची माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या एका विधानावरुन अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’स्थापन केली. या पार्टीला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, दीपके याने देशातील शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या गैरकारभाराबद्दल आणि पेपर फुटी प्रकरणावरून थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना लक्ष्य केले आहे.
‘शांततापूर्ण मार्गाने एकत्र या’
अमेरिकेत राहणाऱ्या अभिजीतने तिथूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या गैरकारभाराबद्दल आणि पेपर फुटी प्रकरणावरून थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना लक्ष्य केले होते. त्याने एक्सवर पोस्ट करत आपण भारतात येत असल्याचे जाहीर केले असून आपले नशीब भारताच्या संविधानाच्या हातात दिले असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनाची घोषणा करताना त्याने संविधानाच्या मार्गाने सर्वांनी शांततापूर्ण पद्धतीने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. जर सर्वांनी मिळून आवाज उठवला तर सरकारला नक्कीच ऐकावे लागेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.