'कॉकरोच कभी डरते नहीं…'; अभिजीत दिपके यांची जंतर-मंतरवर घोषणाबाजी, NEET पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी 
राष्ट्रीय

'कॉकरोच कभी डरते नहीं…'; अभिजीत दिपके यांची जंतर-मंतरवर घोषणाबाजी, NEET पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

जंतर-मंतर येथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत असून "धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो" अशा घोषणा देत आंदोलनकर्ते सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीतील कथित गैरप्रकारांवरून शनिवारी (दि.६) नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पक्षाने (CJP) आयोजित केलेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. "कॉकरोच डरते भी नहीं, कभी मरते भी नहीं," अशी घोषणा देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. "देशातील तरुण आता घाबरणार नाहीत, ते लढतील," असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आंदोलनकर्ते आक्रमक

जंतर-मंतर येथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांकडून शिक्षणमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. "धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो" अशा घोषणा देत आंदोलनकर्ते सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

तसेच, "We asked for 'Make in India', you gave us 'Leak in India'," अशा घोषणांमधून पेपरफुटी प्रकरणावर टीका करण्यात येत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके यांच्याकडे

या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके करत आहेत. आंदोलनासाठी ते अमेरिकेतील बोस्टन येथून भारतात आले आहेत. नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मचरित्राची प्रत दिसून आली.

आंदोलनापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट

आंदोलनापूर्वी पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलनाची माहिती दिली होती. एक्सवरील पोस्टमध्ये, "भारतीय संविधानाच्या पाठिंब्याने कॉकरोच जंतर-मंतर येथे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत," असे म्हटले होते.

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी दिल्याची माहितीही पक्षाकडून देण्यात आली. "दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथील आंदोलनाला परवानगी दिली आहे. आता आम्ही थेट जंतर-मंतर येथे एकत्र येऊ शकतो," असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांकडून विशेष परवानगी

नवी दिल्ली जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही परवानगी एकदाच विशेष सवलत म्हणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

परीक्षा गैरव्यवहारांवरून देशभरात नाराजी

परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. पेपरफुटी आणि प्रशासकीय त्रुटींमुळे NEET-UG २०२६ परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. दरम्यान, CBSE च्या बारावीच्या निकालांमध्ये ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) पोर्टल आणि निविदा प्रक्रियेतील कथित त्रुटींवरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत. या मुद्द्यांवरून दिल्लीसह देशातील विविध भागांत विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती