नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसने सोमवारी देशभरात एल्गार पुकारला. मतदार यादीच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) प्रक्रियेतील कथित घोटाळे आणि अंतर्गत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, छत्तीसगड, उत्तराखंडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. आग्र्यात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या घराला काळे फासून शाईफेक करून ‘ज्ञानेश कुमार गद्दार, मत चोर’ असे लिहून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राजस्थानात पायी मार्च काढणारे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार, निवडणूक आयोगाच्या अंतर्गत रचनेत आणि मतदार याद्यांमध्ये नाव वाढवणे/वगळणे याबाबत इतर दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी) ज्ञानेश कुमार यांच्या काही एकतर्फी व घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवर लेखी आक्षेप घेतले होते. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचा असा आरोप आहे की, ज्ञानेश कुमार हे इतर आयुक्तांचे न ऐकता मनमानी पद्धतीने काम करत असून त्यांनी विरोधी पक्षांचे मतदार वगळण्याचे घटनाबाह्य पाऊल उचलले आहे, जे देशद्रोहासारखे आहे. याप्रकरणी विरोधी पक्षांनी संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग आणण्याचीही तयारी सुरू केली आहे.
कार्यकर्त्यांनी लिहिले ‘ज्ञानेश गद्दार’, ‘वोट चोर’
लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांशी भिडले, तर काशी, वाराणसीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या घेऊन आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उत्तर प्रदेशात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.लखनऊमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग करून रोखले. यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.आग्रा येथील विजय नगर भागातील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मूळ निवासस्थानाबाहेर काँग्रेस आणि युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतींवर काळा ऑईल पेंट आणि शाई फासली. तसेच ब्लॅक स्प्रे पेंटचा वापर करून गेटवर ‘ज्ञानेश गद्दार’ आणि ‘वोट चोर’ असे लिहिले.
जयपूरमध्ये निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा
राजस्थानच्या जयपूरमध्ये शहीद स्मारक येथे सभा झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी बॅरिकेडिंग करून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत-प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, या गदारोळानंतर पोलिसांनी अशोक गेहलोत आणि डोटासरा यांच्यासह कार्यकर्त्यांवर वॉटर कॅननचा वापर केला व व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात नेले.
ज्ञानेश कुमारांना प्रतीकात्मक ठोकल्या बेड्या
मध्य प्रदेशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्याविरोधात भोपाळमध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाला घेराव घालण्यासाठी पोहोचले. यादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काही कार्यकर्ते बॅरिकेड्सवरही चढले. तसेच प्रतीकात्मकरीत्या ज्ञानेश कुमारांना बेड्याही घालण्यात आल्या. बिहार मतचोरीविरोधात बिहारमध्ये काँग्रेसने हल्लाबोल करीत पाटणा-औरंगाबादमध्ये आक्रोश मार्च काढला. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातही काँग्रेसने आक्रोश मार्च काढत आहे. पाटणा महानगर काँग्रेस समितीने कदमकुआं येथून आक्रोश मार्च काढला.
राज्यभर काँग्रेस आक्रमक
पुणे/मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारावर गंभीर आक्षेप घेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने सोमवारी अनेक भागांत आंदोलन करण्यात आले.ज्ञानेश कुमार यांना पदावरून तत्काळ हटवण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना केंद्र सरकारने पदावरून दूर करावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसने या आंदोलनातून केली आहे.
पुण्यासोबतच मुंबई, ठाणे, नागपूर, अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर निदर्शने केली गेली. या ठिकाणी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
पुण्यात निदर्शने
काँग्रेसच्या या राज्यव्यापी आंदोलनाचे तीव्र पडसाद पुण्यातही उमटले. पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यावर उतरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
‘एसआयआर’ हटाओ, देश बचाओ...
ठाणे : ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी तब्बल १४ वेळा आक्षेप नोंदवूनही ज्ञानेशकुमार यांनी हुकूमशाही पद्धत राबविली आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. यावेळी ‘एसआयआर’ हटाओ, देश बचाओ, अशा घोषणा देण्यात आल्या. तर, सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी या दोघांचा गौरव करण्यात आला.
हिंगोलीत बावनकुळेंचा ताफा रोखला
शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याचदरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यालयासमोरून जात असताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ताफा सुमारे दहा मिनिटे रोखला. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडत बावनकुळेंना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, तसेच निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.