‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत मोहम्मद अली जिन्ना आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर मोठा आरोप केला. याच आरोपांवर प्रियंका गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
लोकसभेत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत काँग्रेसने आज (दि. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका करून राजकीय वातावरण तापवले. काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी यांनी “पंतप्रधानांचे भाषण चांगले असते, पण तथ्यांच्या बाबतीत ते नेहमीच कमी पडतात.” असे म्हणत मोदींवर टीका केली.
खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत सांगितले की, "आजचा वाद निर्माण करण्यामागे दोन राजकीय कारणे आहेत. एक तर बंगाल निवडणुका जवळ आल्या आहेत. यासाठी पंतप्रधान स्वतःसाठी भूमिका तयार करत आहेत. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांवर नवे आरोप लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्या नेत्यांची बदनामी करण्याची ही संधी सरकार शोधत आहे. सरकार निवडणूक नजरेत ठेवून वंदे मातरमचा मुद्दा पुढे करत आहे.”
त्यांनी असा आरोप केला की, सरकार महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि आर्थिक संकट यांसारख्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष हटवत आहे.
काँग्रेस देशासाठी तर भाजप निवडणुकीसाठी
“आम्ही या देशाच्या मातीसाठी लढतो. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. वंदे मातरम् आमच्यासाठी नेहमीच पवित्र राहिले आहे आणि राहील. काँग्रेस देशासाठी आहे तर भाजप निवडणुकांसाठी."असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला.
नेहरू नसते तर भारताची प्रगती अशक्य
खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, "सरकार राष्ट्रीय गीतावर चर्चा करून देशाचे लक्ष गंभीर मुद्द्यांपासून वळवत आहे. नेहरूंचे योगदान पुसता येणार नाही. जितकी वर्षे मोदी पंतप्रधान आहेत, त्यापेक्षा अधिक वर्षे नेहरू तुरुंगात होते. नेहरूंनी ISRO, DRDO, IIT–IIM, AIIMS, BHEL–SAIL स्थापन केले; हे नसते तर भारताची प्रगती अशक्य होती.”
नेहरू देशासाठी जगले आणि देशासाठीच...
त्यांनी दावा केला की, "नेहरू देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. स्वातंत्र्यानंतर भारताच्या आधुनिक पायाभूत रचनेचा पाया नेहरूंनीच घातला."
भाजप आणि आरएसएसच्या कार्यक्रमात 'वंदे मातरम्' असतं का?
प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप केला की, "त्यांनी इतिहास अपूर्ण स्वरूपात मांडला." त्या म्हणाल्या, “मोदींनी सांगितले की, १८९६ मध्ये टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ एका कार्यक्रमात गायले, पण तो काँग्रेसचा कार्यक्रम होता हे त्यांनी मुद्दाम सांगितले नाही.” यासोबतच, “वंदे मातरम् आपण पवित्र मानतो पण भाजप आणि आरएसएसच्या कार्यक्रमात ते गायलं जातं का?” असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?
१९३६ साली मोहम्मद अली जिन्ना यांनी या वंदे मातरम् या गीताला विरोध केला. त्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी या विरोधाला उत्तर देण्याऐवजी, उलट ‘वंदे मातरम्’ गीताचीच चौकशी सुरू केली होती. १९३७ मध्ये मुस्लिम लीगने वंदे मातरमला विरोध दर्शवूनही पंडित नेहरु मुस्लिम लीगच्या विरोधात बोलले नाहीत. जिन्ना यांच्या विरोधानंतर पंडित नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहिले होते की, वंदे मातरम् मुसलमानांना प्रवृत्त करू शकते, त्यामुळे त्याचा पुनर्विचार करावा.
इतक्या प्रभावी आणि प्रेरणादायी गीतावर पुढील काळात अन्याय का झाला? ‘वंदे मातरम्’चा सन्मान कमी करण्यामागे कोणत्या शक्ती होत्या? असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. त्यावर काँग्रेसकडून उत्तर देण्यात आले आहे.