अलाहाबाद उच्च न्यायालय आणि संभल येथील जामा मशिद संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

न्यायालयाकडून संभलमधील जामा मशिदीचा ‘वादग्रस्त रचना’ उल्लेख; हिंदू पक्षात उत्साह, तर मुस्लिम पक्षाला धक्का

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्या. रोहित रंजन यांनी जामा मशिदीचा उल्लेख वादग्रस्त रचना म्हणून केला आहे.

Swapnil S

संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्या. रोहित रंजन यांनी जामा मशिदीचा उल्लेख वादग्रस्त रचना म्हणून केला आहे. न्यायमूर्तींच्या या उल्लेखामुळे हिंदू पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे मुस्लिम पक्षाला मात्र यामुळे धक्का बसला आहे.

संभल येथील जामा मशिदीवरून अजूनही वाद सुरू आहे. हिंदू पक्षाचा असा दावा आहे की, तिथे पूर्वी हरिहर मंदिर होते जे पाडून मशीद बांधण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात बऱ्याच काळापासून सुरू आहे. उच्च न्यायालयात यावर अनेकवेळा वादविवाद झाले आहेत. आता, उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, जामा मशिदीचा उल्लेख वादग्रस्त रचना म्हणून करण्यात आला आहे.

यापूर्वी जामा मशिदीत रंगकाम करण्यास परवानगी मागितल्यानंतरही मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने झटका दिला होता. त्या मागणीबाबत, उच्च न्यायालयाने ‘एएसआय’ला अहवाल तयार करण्यास सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने तीन सदस्यांचे एक पथक तयार केले होते, ज्यामध्ये प्रशासनाचा एक सदस्य आणि एक ‘एएसआय’ अधिकारी यांचा समावेश होता. काही तासांच्या सर्वेक्षणानंतर, ‘एएसआय’ने आपला अहवाल सादर केला, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या.

मशिदीत आढळले अनेक बदल

‘एएसआय’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, सध्या रंगकामाची गरज नाही, आता त्याच अहवालाच्या आधारे न्यायालयानेही रंगकामासाठी परवानगी नाकारली. त्याच अहवालात मशिदीत काही बदलदेखील झाल्याचे सूचित करण्यात आले होते. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, मशिदीत अनेक बदल दिसून आले आहेत. मशिदीच्या फरशीवरील टाइल्स आणि दगडांमध्ये बदल दिसून आले आहेत. याशिवाय, मशिदीच्या अनेक भागांमध्ये सोनेरी, लाल, हिरवा आणि पिवळा रंगांचा जाड इनॅमल रंग देखील देण्यात आला आहे. या रंगाद्वारे मूळ पृष्ठभाग झाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हिंसाचारात चौघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील संभल येथे गेल्यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेकजण जखमी झाले होते. यानंतर देशभरात वातावरण तापले होते.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश