सोनम वांगचुकना ‘मेदांता’मध्ये हलवण्याचे कोर्टाचे आदेश (Photo-X/@ani_digital)
राष्ट्रीय

सोनम वांगचुकना ‘मेदांता’मध्ये हलवण्याचे कोर्टाचे आदेश

पेपरफुटीच्या मुद्द्यावर २८ जूनपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम येथील 'मेदांता' रुग्णालयात तातडीने हलवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

Swapnil S

नवी दिल्ली : पेपरफुटीच्या मुद्द्यावर २८ जूनपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम येथील 'मेदांता' रुग्णालयात तातडीने हलवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांच्या याचिकेवर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याच्या रविवारच्या न्यायाधीशांच्या निर्णयाला आंगमो यांनी आव्हान दिले होते.

त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने स्पष्ट केले की, रुग्णाचा त्याच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा हक्क हा घटनेच्या कलम १९ आणि कलम २१ अंतर्गत मिळालेल्या मूलभूत अधिकारांचा भाग आहे.

आम्ही केवळ (वांगचुक यांच्या) मूलभूत अधिकारांशी बांधील आहोत. बाहेर काय सुरू आहे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाने मेदांता रुग्णालयाच्या संचालकांना तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथक स्थापन करून वांगचुक यांच्या प्रकृतीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, डॉक्टरांनी स्वीकृत वैद्यकीय नियम व मानकांनुसारच औषधोपचार करावेत आणि वांगचुक यांनी त्या वैद्यकीय सल्ल्यांचे पालन करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वांगचुक यांना मेदांता येथे हलवण्यास सरकारची कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. मेदांता हे एक नामांकित रुग्णालय आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांनी तेथून डिस्चार्ज घेऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली.

यापूर्वी २१ व्या दिवशी जंतर-मंतर येथील आंदोलनावरून दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. त्याला आंगमो यांनी बेकायदेशीर स्थानबद्धता मानून न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयास यात ओढू नका : तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : संसद भवनावर मोर्चा काढणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या "अतिबळाच्या वापरा"विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट नकार दिला. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला ठणकावून सांगितले की, न्यायालयाला या सगळ्यात ओढू नका. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी नियमित प्रक्रियेनुसार घेतली जाणार आहे.

सोमवारी आंदोलकांना संसदेपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अत्यंत हिंसक मार्गांचा वापर केल्याचा आरोप सीजेपी'ने केला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गीतांजली आंगमो यांना कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही, आणि याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे "खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या" आहेत, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

जखमी तरुणी व्हेंटिलेटरवर

सोमवारच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेली एक तरुण महिला आंदोलक गंभीर असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिच्यावर येथील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, सोमवारी झालेल्या या आंदोलनात ११८ पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर ६० आंदोलक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

झुरळांचे आंदोलन काँग्रेसने केले हायजॅक!

कॉकरोच जनता पार्टीच्या सुरू असलेल्या आंदोलनाला उघड पाठिंबा देणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) काँग्रेसच्या पंतप्रधान निवासस्थानावरील धरण्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये 'जुगलबंदी' सुरू असल्याचा आरोप करत ‘आप’ने राहुल गांधी सीजेपीच्या आंदोलनाला कमकुवत करत असल्याचे म्हटले आहे. सीजेपी आणि सोनम वांगचुक जंतरमंतरवर एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत, पण मोदी सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही. दुसरीकडे राहुल गांधींना पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते आणि तासाभरात मोदी सरकार त्यांच्याशी संवाद सुरू करते, हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका आतिशी यांनी केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Protest : संघर्ष सुरूच राहणार; झुरळांनी व्यक्त केला निर्धार

एक ना धड भाराभर चिंध्या!

देवेंद्रजींचे ध्यासपर्व!

आजचे राशिभविष्य, २२ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Ashadhi Ekadashi 2026: उपवासात झटपट बनवा चविष्ट बटाट्याची उसळ; फक्त १० मिनिटांत होईल तयार