राष्ट्रीय

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल चंद्रपुरम पोन्नुसामी (सी.पी.) राधाकृष्णन यांची निवड झाली.

नेहा जाधव - तांबे

भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल चंद्रपुरम पोन्नुसामी (सीपी) राधाकृष्णन यांची निवड झाली. मंगळवारी (दि. ९) झालेल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला असून त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.

राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली, तर विरोधी उमेदवार रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या विजयामुळे एनडीएने उपराष्ट्रपतीपदावर आपली पकड कायम ठेवली आहे.

सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत?

२० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुप्पूर येथे जन्मलेले सी.पी. राधाकृष्णन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांना चार दशकांहून अधिक काळाचा राजकीय अनुभव आहे. जुलै २०२४ पासून ते महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

त्याआधी फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान त्यांनी झारखंडचे राज्यपालपद भूषवले, तसेच काही काळ तेलंगणा आणि पुद्दुचेरीचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला.

१९७० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून कार्य सुरू करत त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २००४ ते ०७ दरम्यान ते भाजप तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष होते. कोइम्बतूर मतदारसंघातून ते दोनदा लोकसभेवर निवडून आले, जी कामगिरी तामिळनाडूमध्ये भाजप नेत्यांसाठी दुर्मिळ मानली जाते.

राधाकृष्णन यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. ते कॉलेज-स्तरीय टेबल टेनिस चॅम्पियन आणि लांब पल्ल्याचे धावपटू राहिले आहेत. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्येही त्यांना रस आहे. त्यामुळे राजकारणासोबतच त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि वैविध्यपूर्ण आहे.

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी

गर्भधारणा रोखणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोहित कंबोज यांचा राजकारण संन्यास?