राष्ट्रीय

Delhi Assembly Elections 2025 Results Live Updates: 'आप'ला डबल झटका; केजरीवाल-सिसोदियांचा पराभव, दिल्लीत २७ वर्षांनी कमळ फुलणार!

दिल्लीची सत्ता २०१५ पासून ‘आप’च्या हाती आहे. २७ वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर भाजप आता पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. तर, दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदाही दिल्लीतील मुख्य लढत आप आणि भाजप यांच्यातच आहे. मध्यमवर्गीय मतदारांबरोबरच दलित-मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने वळणार, ही बाब निर्णायक ठरू शकते.

Swapnil S

दिल्ली निवडणुकीत भाजपचा मोठा विजय

दिल्ली निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ७० विधानसभा जागांपैकी ४७ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. निवडणूक आयोगाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत दिलेल्या अपडेटनुसार भाजपने ४७ जागांवर विजय मिळाला असून 'आप'ने २२ जागा जिंकल्या आहेत. तर एका जागेचा निकाल अजून घोषित होणे बाकी आहे.

विजयानंतर प्रवेश सिंग (वर्मा) यांची प्रतिक्रिया

दिल्ली निवडणुकीत विजयानंतर प्रवेश सिंग (वर्मा) यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेलाा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''दिल्लीकरांना गर्व होईल अशी राजधानी बनवायची आहे. आम्ही महिलांना 2500 रुपये देण्याचे वचन दिले होते, भ्रष्टाचाराविरुद्ध एसआयटी गठित करणे, दिल्लीचे प्रदूषण कमी करणे, वाहतूकीच्या प्रश्नावर काम करणे, दिल्लीला सुंदर बनवणे जगातील इतर राजधानीच्या शहरांप्रमाणे दिल्लीचा देखील विकास करणे ही आमची प्राथमिकता असणार आहे, असे ते म्हणाले.''

दिल्ली निडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतक्रिया

दिल्ली निवडणूक निकालांवर केजरीवाल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली केजरीवाल म्हणाले, ''आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपचे अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की ते लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे ती सर्व आश्वासने पूर्ण करतील. गेल्या १० वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. आम्ही केवळ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहू आणि त्यांची सेवा करत राहू."

दिल्ली निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभा निकालांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ''आम्ही दिल्लीचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी - प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध - हा लढा सुरूच राहील.''

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली विधानसभेच्या निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली. ''लोकशक्ती ही सर्वोपरि आहे! विकास जिंकला, सुशासन जिंकले. दिल्लीचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही; ही आमची हमी आहे. यासोबतच, विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची भूमिका महत्त्वाची राहील याचीही आम्ही खात्री करू. ''

अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीमध्ये तब्बल २७ वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, 'दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल', असा विश्वास व्यक्त केला आहे. शहा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. "दिल्लीतील जनतेने दाखवून दिले की, वारंवार खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करता येणार नाही. गलिच्छ यमुना, पिण्याचे अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेली गटारे आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकाने यासर्व बाबींवर जनतेने आपल्या मतांनी प्रतिसाद दिला आहे," असे शहा यांनी म्हटले. पुढे त्यांनी, "दिल्लीतील या भव्य विजयासाठी ज्यांनी रात्रंदिवस काम केले त्या दिल्ली भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आणि प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महिलांचा आदर असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असो, दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल", असा विश्वासही व्यक्त केला.

'आप'ला डबल झटका; केजरीवाल-सिसोदियांचा पराभव, आतिशी विजयी

दिल्ली निवडणुकांचे निकाल येण्यास आता सुरूवात झाली असून आम आदमी पक्षाला मोठा झटका बसलाय. पक्षाचे दोन मोठे नेते अर्थात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया या दोघांचाही पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या प्रवेश सिंग (वर्मा) यांच्याकडून केजरीवाल यांना तर जंगपूरा मतदारसंघातून मनिष सिसोदिया यांना तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर, कालकाजी मतदारसंघातून भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करत आतिशी यांनी निसटता विजय मिळवला आहे. अद्याप मतांची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.

भाजपचा २७ वर्षांचा 'वनवास' संपणार; दिल्लीत कमळ फुलणार!

राजधानी दिल्लीमध्ये तब्बल २७ वर्षांनी भाजप सत्तेत परतण्याची दाट शक्यता आहे. ७० पैकी ४६ जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. तर, २४ जागांवर 'आप'कडे आघाडी आहे. याआधी १९९३ मध्ये भाजपने दिल्लीत सरकार स्थापन केले होते.

भाजपची आघाडी अजून वाढली

दिल्लीमध्ये २७ वर्षांनंतर भाजपची सत्ता येणार असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुरूवातीच्या ट्रेंड्समध्ये भाजपने आता अजून आघाडी घेतली आहे. आता ७० पैकी ४६ जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. तर, २४ जागांवर 'आप'कडे आघाडी आहे. तथापि, हे केवळ कल असून अद्याप एकही निकाल आयोगाने जाहीर केलेला नाही.

EC ने केले जारी सर्व ७० जागांचे 'ट्रेंड्स'

सकाळी १०.३० च्या सुमारास भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिल्लीतील सर्व ७० जागांचे सुरूवातीचे कल अपडेट केले असून भाजपने ४३ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा ओलांडला आहे. तर आप पक्षाला मतदारांनी झटका दिल्याचं दिसत असून अवघ्या २७ जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला यंदाही भोपळा फोडणं कठीण असल्याचं चित्र आहे. त्यांचा एकही उमेदवार आघाडीवर नाहीये.

निवडणूक आयोगाच्या 'ट्रेंड्स'मध्ये भाजपला बहुमत; ७० पैकी ५२ जागांचे कल जाहीर

दिल्ली निवडणुकीत ईव्हीएमची मतमोजणी सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत संकेस्थळावर ७० पैकी ५२ जागांचे सुरुवातीचे कल अपडेट केले आहेत. सकाळी ९.४४ वाजताच्या अपडेटनुसार ५२ पैकी भाजप ३६ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच बहुमताचा जादुई आकडा भाजपने गाठला आहे. तर, आप १६ जागांवर आघाडीवर आहे.

निवडणूक आयोगाकडून ७० पैकी ४६ जागांचे ट्रेंड्स जाहीर

दिल्ली निवडणुकीत ईव्हीएमची मतमोजणी सुरू असून भारतीय निवडणूक आयोगाने ७० पैकी ४६ जागांचे सुरुवातीचे कल आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट केले आहेत. सकाळी ९.३८ वाजेपर्यंतच्या आकेडवारीनुसार, भाजप ३२ जागांवर तर आप १४ जागांवर आघाडीवर आहेत. अद्याप एकही निकाल आयोगाने जाहिर केलेला नाही.

केजरीवाल, अतिशी पिछाडीवर

आम आदमी पार्टीचे (आप) अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून आणि मुख्यमंत्री अतिशी कालकाजी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. जंगपुरामधून मनीष सिसोदिया आणि पटपडगंजमधून अवध ओझा आघाडीवर आहेत. यापूर्वी हे दोघेही पिछाडीवर होते.

ओखलामधून भाजपची आघाडी

ओखला मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी ८ हजार मतांनी पुढे आहेत. जनकपुरीतून भाजपचे आशिष सूद पुढे आहेत. पटपडगंज मतदारसंघातून आपचे अवध ओझा मागे आहेत. राजेंद्र नगरमधून आपचे दुर्गेश पाठक पुढे आहेत. ट्रेंडमध्ये भाजप ४३ जागांवर पुढे आहे. आप २६ जागांवर आघाडीवर आहे.

सत्तेत उलटफेर? 'ट्रेंड्स'नुसार भाजपला बहुमत!

दिल्ली निवडणुकीत ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये केजरीवाल यांचा झाडू सातत्याने मागे पडत आहे. तर भाजपचे कमळ निर्णायक आघाडी घेताना दिसत आहे. भाजप सध्या ४३ जागांवर पुढे आहे. 'आप'ने २६ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस एका जागेवर पुढे आहे. भाजपने कलांमध्ये बहुमताचा (३६) आकडा ओलांडला आहे. तथापि, हे सुरूवातीचे आकडे असल्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे.

मतपत्रिकांची मोजणी संपली; EVM मोजणी सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाली असून आता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली आहे. दिल्लीच्या ७० पैकी निम्म्याहून अधिक जागांचे सुरूवातीचे कल हाती आले असून यानुसार भाजप ३० जागांवर तर आम आदमी पार्टी (आप) २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे.

भाजप-आपमध्ये 'कांटे की टक्कर'

सुरूवातीच्या बॅलेट मोजणीमध्ये आप आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळत असून आप २४ तर भाजप २९ जागांवर पुढे आहे.

कुठे कोण पुढे?

ग्रेटर कैलाशमधून 'आप'चे सौरभ भारद्वाज आघाडीवर आहेत. ओखलामधून अमानतुल्ला खान पुढे आहेत. सुलतानपूर माजरामधून मुकेश अहलावत पुढे आहेत. भाजपचे कपिल मिश्रा करावल नगरमधून पुढे आहेत. मोतीनगरमधून भाजपचे हरीश खुराना पुढे आहेत. राजौरी गार्डन येथून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या बॅलेट मोजणीत नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल, कालकाजी मतदारसंघातून आतिशी आणि जंगपुरामधून मनीष सिसोदिया मागे आहेत.

भाजप १९, आप १५ आणि काँग्रेस एका जागेवर पुढे

मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली असून सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप १९, आप १५ आणि काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.

दिल्लीत मतमोजणी सुरू, सर्वात आधी मतपत्रिकांची मोजणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सर्वात आधी मतपत्रिकांची मोजणी केली जात आहे. ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील ७० जागांसाठी ६०.५४% मतदान झाले. एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. आप आणि काँग्रेस ७०-७० जागांवर, तर भाजप ६८ जागांवर लढत आहेत. भाजपने एक जागा JDU आणि एक जागा LJP (R) ला दिली आहे.

"दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन व्हावे"

"दिल्लीच्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रार्थना केली", असे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार परवेश वर्मा मतमोजणी सुरू होण्याआधी म्हणाले.

मध्यमवर्गीय मतदार कुणाच्या बाजूने?

दिल्ली निवडणुकीत मध्यमवर्गीय मतदार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीतील ६७% कुटुंबे मध्यमवर्गीय आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी दिल्यामुळे भाजपला या मतदारांची साथ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘आप’ला दोन टर्मच्या सत्ताविरोधी लाटेसोबतच भ्रष्टाचाराच्या आरोपांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दिल्लीतही लाडकी बहिणची जादू चालणार?

महिला मतदारांचा प्रभाव हा एकंदरीत देशभरातील निवडणुकांमध्ये जाणवू लागला आहे. भारताच्या लोकसंख्येत महिला मतदारांचा ४८% वाटा आहे. त्यामुळे महिला मतदार या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावू शकतात. मध्य प्रदेशात लाडली बहना, महाराष्ट्रात लाडकी बहीण या योजनांमुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटले. याच पार्श्वभूमीवर ‘आप’ने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना अंतर्गत १,००० ते २,१०० रुपये महिन्याला देण्याचे आश्वासन दिले आहे, तर दुसरीकडे याला आव्हान देत भाजपने महिन्याला २,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ही आश्वासने महिला मतदारांना भुरळ घालतात का? या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीवर मोठा परिणाम करू शकते.

मुस्लिम मतदारांमध्ये फुट पडणार?

दिल्लीत मुस्लिम मतदारांपेक्षा दलित मतदारांची संख्या अधिक आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात त्यांचे वास्तव्य आहे. गेल्या काही वर्षांत ‘आप’ला दलित मतदारसंघाचा मोठा पाठिंबा मिळत होता, पण यंदा त्यात फूट पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ फेब्रुवारीच्या सभेत झोपडपट्ट्या न पाडण्याचे आश्वासन दिले, तसेच भाजपने दलितांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. भाजप दलितबहुल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार व संपर्क अभियान राबवत आहे. त्यामुळेही ‘आप’ला आव्हान निर्माण झाले आहे.

मुस्लिम मतदार निर्णायक ठरणार?

दिल्लीतील मुस्लिम मतदारसंख्या १३%च्या आसपास आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘आप’च्या बाजूने मतदान केले आहे. काँग्रेसने मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला असला, तरी ‘आप’ची मागील वर्षांमधली कामगिरी पाहता मुस्लिम मतदारांचा कल काँग्रेसपेक्षा आपच्या बाजूने राहण्याची शक्यता अधिक असल्याचे विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. दिल्लीतील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक ठरू शकतात.

आप आणि भाजपमध्येच मुख्य लढत

दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मुख्य सामना आप आणि भाजप यांच्यातच दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात भरघोस आश्वासने दिली आहेत.

दिल्लीचा पॅटर्न कायम राहणार?

एका सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील जवळपास एक तृतीयांश मतदार लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि विधानसभा निवडणुकीत आपला मतदान करतात. हा पॅटर्न ८ फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीत टिकतो की बदलतो, यावर दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होईल, हे अवलंबून आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक