राष्ट्रीय

आंदोलन स्थगित, अश्रूधुराच्या माऱ्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मका, कापूस आणि डाळींना पाच वर्षांसाठी देऊ केलेला हमीभावाचा प्रस्ताव नामंजूर झाल्याने पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलकांनी बुधवारी पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू केला. पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी शंभू आणि खानौरी सीमेवर अश्रूधुराचा मारा केला. त्यात एक शेतकरी आंदोलक ठार झाला. हरयाणाच्या जिंद जिल्ह्यात शेतकऱ्यांशी झालेल्या झटापटीत १२ पोलीस जखमी झाले. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आंदोलन दोन दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाच्या पुढील दिशेविषयी निर्णय शुक्रवारी सायंकाळी घेतला जाईल, असे शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने आंदोलकांना शांततेचे आवाहन केले असून चर्चेच्या पाचव्या फेरीसाठी आमंत्रण दिले आहे.

शेतीमालाला किमान आधारभूत किंमतीची हमी मिळावी म्हणून पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीपासून दिल्ली चलो आंदोलन सुरू केले होते. त्यांना रोखण्यासाठी पंजाब-हरयाणा आणि दिल्लीच्या सीमेवर सुरक्षादलांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेतकऱ्यांनीही ट्रॅक्टर्स, ट्रॉलीज, बुलढोझर यांच्यासह जय्यत तयारी केली आहे. केंद्र सरकराच्या तीन मंत्र्यांनी आजवर शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेच्या चार फेऱ्या पार पाडल्या आहेत. त्यात सरकारतर्फे मका, कापूस आणि डाळींसह पाच पिकांना, पाच वर्षांसाठी हमीभाव देण्याची तयारी दाखवण्यात आली होती. पण शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव नाकारला आणि बुधवारपासून पुन्हा मोर्चा सुरू केला.

मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी शंभू आणि खानौरी सीमेवर अश्रूधुराचा मारा केला. यावेळी खानौरी सीमेवर पोलिसांनी डागलेले अश्रूधुराचे नळकांडे डोक्यात लागल्याने सुभकरण सिंग हा २१ वर्षीय शेतकरी आंदोलक गंभीररीत्या जखमी झाला. तो पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील बालोके गावचा मूळ रहिवासी होता. त्याला पतियाळा येथील रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हरयाणाच्या जिंद जिल्ह्यात पोलीस आणि आंदोलकांची झटापट होऊन त्यात १२ पोलीस जखमी झाले. केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन