राष्ट्रीय

शेतकरी आंदोलन: उद्या केंद्रासोबत पुढील चर्चा; एका शेतकऱ्याचा हार्टअटॅकने मृत्यू

केंद्राच्या तीन मंत्र्यांच्या समितीने आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या नेत्यांबरोबर आतापर्यंत ८, १२ आणि १५ फेब्रुवारी रोजी चर्चेच्या तीन फेऱ्या पार पाडल्या

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अर्जुन मुंडा आणि पीयूष गोयल या केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले की, शेतकरी नेत्यांबरोबर केंद्राच्या शिष्टमंडळाची तिसरी बैठक सकारात्मक होती. यापुढील चर्चा उद्या म्हणजेच रविवारी होणार आहे.

केंद्राच्या तीन मंत्र्यांच्या समितीने आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या नेत्यांबरोबर आतापर्यंत ८, १२ आणि १५ फेब्रुवारी रोजी चर्चेच्या तीन फेऱ्या पार पाडल्या. त्यापैकी नुकत्याच झालेल्या तिसऱ्या फेरीत सकारात्मक चर्चा झाल्याचे ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच या संदर्भात अधिक चर्चा रविवारी होणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय अमित शहा, मुंडा आणि गोयल यांनीही नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. या बैठकीला गृह, कृषी आणि अन्य खात्यांचे सचिवही उपस्थित होते.

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. शुक्रवारी आंदोलकांनी सकाळी ६ ते सायंकाळी ४ या वेळेत भारत बंदची हाक दिली होती. यापुढील काळात देशातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत चक्का जाम आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केले. या आंदोलनामुळे दिल्ली शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक खोळांबली होती. पंजाब, हरयाणा आणि दिल्लीजवळच्या प्रदेशात पोलीस आणि आंदोलकांमधील झटापट सुरूच होती. पोलिसांनी केलेल्या ड्रोन, अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि अन्य उपायांना शेतकरी विविध प्रकारे उत्तर देत आहेत.

आंदोलनात शेतकऱ्याचा मृत्यू

आंदोलनातील एका वृद्ध शेतकऱ्याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ग्यान सिंग (वय ६३) असे त्यांचे नाव असून सकाळी शंभू बॉर्डरजवळ आंदोलन करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते कोसळले. त्यांना पतियाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता