दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश 
राष्ट्रीय

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

भारतात मे महिन्यापासून बंद करण्यात आलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : भारतात मे महिन्यापासून बंद करण्यात आलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. नीट (NEET) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हे अकाउंट तात्पुरते बंद करण्यात आल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. मात्र, परीक्षा पूर्ण झाल्याने ते कारण आता लागू होत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अकाउंट पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

CJP संस्थापकांच्या याचिकेला न्यायालयाचा दिलासा

न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी हा आदेश देताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दाखल केलेली याचिका मंजूर केली. केंद्र सरकारने अकाउंट ब्लॉक करण्याचा निर्णय आव्हान देत ही याचिका दाखल करण्यात आली होती.

'नीट' पुनर्परीक्षेमुळे अकाउंट ब्लॉक केल्याचा दावा

केंद्र सरकारतर्फे बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, २१ जून रोजी झालेल्या NEET पुनर्परीक्षेपूर्वी विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित 'एक्स' हँडल तात्पुरते बंद करण्यात आले होते.

यावर न्यायालयाने, "NEET परीक्षा आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अकाउंट ब्लॉक ठेवण्याचे कारण उरलेले नाही. अशा परिस्थितीत तो आदेश रद्द करण्यात येत असून याचिका मंजूर करण्यात येत आहे," असे स्पष्ट केले.

वादानंतर सुरू झाले होते व्यंगात्मक डिजिटल व्यासपीठ

कॉकरोच जनता पार्टीचे मूळ 'एक्स' अकाउंट १५ मे रोजी सुरू करण्यात आले होते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या वादानंतर व्यंगात्मक डिजिटल व्यासपीठ म्हणून त्याची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, २१ मे रोजी हे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले.

'Cockroach is Back' हँडललाही मोठा प्रतिसाद

मूळ अकाउंट बंद झाल्यानंतर पक्षाने 'Cockroach is Back' नावाने नवीन 'एक्स' हँडल सुरू केले. या हँडलला सध्या २.२७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

तरुणांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र व्यासपीठ

कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार, तरुणांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि सरकारला जबाबदार धरण्यासाठी स्वतंत्र, युवक-केंद्रित चळवळ उभारण्याचा त्यांचा उद्देश आहे.

याशिवाय, शिक्षण क्षेत्रातील कथित त्रुटी आणि NEET-UG २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी मोहीमही या गटाने सुरू केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी

आळंदीत पावसाचा हाहाकार; इंद्रायणी नदीचे रौद्ररूप, २५० वारकऱ्यांची सुटका