महिला कुस्तीपटू विनेश फोगाटप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे ‘महासंघा’वर ताशेरे 
राष्ट्रीय

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे ‘महासंघा’वर ताशेरे

भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास 'अपात्र' ठरवल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी 'भारतीय कुस्ती महासंघा'ला चांगलेच सुनावले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास 'अपात्र' ठरवल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी 'भारतीय कुस्ती महासंघा'ला चांगलेच सुनावले आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निवड चाचणीत विनेशला सहभागी होता येईल की नाही, याबाबत न्यायालय लवकरच आपला आदेश जारी करणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तेजस कारिया यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने परवानगी दिलेली असतानाही, महासंघ विनेशला निवड चाचणीत उतरण्यापासून रोखत आहे, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. नामवंत खेळाडूंच्या भूतकाळातील कामगिरीच्या जोरावर त्यांना चाचणीत थेट प्रवेश देण्याची जुनी पद्धत मोडीत काढण्याची कुस्ती महासंघाची भूमिका "बरेच काही सांगून जाते," असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

मातृत्वाचा आदर करा

विनेश फोगाट सध्या तिच्या बाळंतपणाच्या सुट्टीनंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर न्यायालयाने म्हटले आहे की, विनेश ही आंतरराष्ट्रीय दर्जाची नामांकित कुस्तीपटू आहे. तिने एका मुलाला जन्म दिला म्हणून तिला अशा प्रकारे डावलले जाऊ शकत नाही. आपल्या देशात मातृत्वाचा उत्सव साजरा केला जातो, त्यामुळे कुस्ती महासंघाने कोणत्याही खेळाडूसोबत 'सूडबुद्धीने' वागू नये.

कुस्ती महासंघाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, महासंघाचे धोरण नवीन मातांच्या विरोधात नाही, तर विनेशने यापूर्वी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत म्हटले की, महासंघाच्या या नव्या धोरणाचा थेट फटका विनेशला बसला असून ती स्पर्धेतून बाहेर पडली आहे. जर ती आई झाली नसती, तर ती आज थेट पात्र ठरली असती. खेळाडूने आपले लक्ष सरावावर केंद्रित केले पाहिजे, कोर्टाच्या पायऱ्या चढण्यावर नाही, असेही न्यायालयाने सुनावले.

केंद्राची भूमिका

केंद्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, जर विनेश निवड चाचणीत यशस्वी ठरली, तर 'भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या' नियमांनुसार तिला आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवण्यासाठी पात्रता निकषांमध्ये शिथिलता दिली जाऊ शकते. मात्र, निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी कुस्ती महासंघानेच नियमात सवलत देणे गरजेचे आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके