Video : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रकला धडकून बसला आग, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी  (Photo - X)
राष्ट्रीय

Video : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रकला धडकून बसला आग, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

हंस ट्रॅव्हल्सची ही बस ऋषिकेशहून मध्य प्रदेशातील इंदूरकडे जात होती. द्रुतगती मार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकला बसने मागून धडक दिल्यानंतर...

किशोरी घायवट-उबाळे

राजस्थान : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी (दि. १) पहाटे भीषण अपघात झाला. प्रवासी बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या भीषण दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघातानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले.

दौसा जिल्ह्यातील धनावडा परिसरात अपघात

ही दुर्घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनावडा परिसरात घडली. हंस ट्रॅव्हल्सची ही बस ऋषिकेशहून मध्य प्रदेशातील इंदूरकडे जात होती. द्रुतगती मार्गावर पुढे जाणाऱ्या ट्रकला बसने मागून धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला.

८ जणांचा मृत्यू, २४ जखमी

दौसा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पियुष दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दोन जणांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातातील २४ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रवाशांमध्ये गोंधळ

धडकेनंतर काही क्षणांतच बस आणि ट्रकला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि बचावकार्य सुरू केले. त्यानंतर जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एका महिलेने सांगितले की, ट्रकला धडक बसताच बसमध्ये आग लागली. या अपघातात तिची मुलगी जखमी झाली असून, पती बेपत्ता असल्याचे तिने सांगितले.

दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, धडकेच्या वेळी तो पत्नी आणि मुलासह झोपला होता. धडकेनंतर त्याची पत्नी खिडकीतून बाहेर फेकली गेली आणि बसजवळ अडकली. काही क्षणांतच त्या भागाला आग लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू

अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकरलाल यांनी सांगितले की, मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख धर्मेंद्र अशी झाली आहे. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, जळालेल्या मृतदेहांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रशासन मदतीसाठी सज्ज

दौसाचे खासदार मुरारीलाल मीणा यांनी घटनास्थळी भेट देत जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत संपूर्ण प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम