नवी दिल्ली : दिल्लीतील इंडिया गेट परिसरात रविवारी संध्याकाळी वायू प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या एका आंदोलनाला अचानक मोठे राजकीय वळण मिळाले. आंदोलनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांनी अलीकडेच आंध्र प्रदेशात चकमकीत मारला गेलेला कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा याचे समर्थन करणारे पोस्टर आणि घोषणाबाजी केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांवर पेपर स्प्रे वापरल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करत २३ हून अधिक लोकांना अटक केली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, इंडिया गेटच्या सी-हेक्सागॉन परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान प्रदर्शनकर्त्यांच्या हातात माडवी हिडमाचे चित्र असलेले पोस्टर दिसले. आंदोलकांनी 'कितने हिडमा मारोगे', 'हर घर से निकलेगा हिडमा' आणि "माडवी हिडमा अमर रहे" अशा घोषणा दिल्या. माडवी हिडमा (४४) हा एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर होता. आंध्र प्रदेशात सुरक्षा दलांसोबत १८ नोव्हेंबरला झालेल्या चकमकीत मारला गेला होता. काही पोस्टर्सवर हिडमाची तुलना आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याशी करण्यात आली होती आणि त्याला 'जल, जंगल और जमीन'चा रक्षक असे संबोधण्यात आले होते.
पोलिसांवर हल्ला
प्रदूषणाविरोधात आवाज उठवत असल्याचा दावा करणाऱ्या या आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाने निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या जंतर-मंतरऐवजी इंडिया गेटवर बेकायदेशीररित्या आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स तोडून रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला असता, काही लोकांनी अचानक पोलिसांच्या दिशेने पेपर स्प्रे मारला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला तीव्र जळजळ झाली. जखमी पोलिसांना तातडीने आरएमएल रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कर्तव्यपथ आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल केले. अटकेतील २३ जणांना दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात येत आहे.