नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात दुरुस्ती आणि बांधकाम सुरू असताना बहुमजली इमारत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. इमारत कोसळतानाचा थरकाप उडवणारा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते.
बांधकाम सुरू असतानाच इमारत कोसळली
माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात रविवारी (दि.०६) दुपारी सुमारे १.३० वाजता ही दुर्घटना घडली. संबंधित इमारतीत विद्यार्थ्यांसाठी पेइंग गेस्ट निवासाची व्यवस्था होती. दुरुस्ती आणि बांधकामाचे काम सुरू असतानाच इमारत अचानक कोसळली.
सहा जणांचा मृत्यू
दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. रात्री आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहावर पोहोचली.
CCTV मध्ये भीषण क्षण कैद
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारत काही क्षणांतच कोसळताना दिसत आहे. इमारतीचा ढिगारा थेट रस्त्यावर पडल्याचेही या फुटेजमध्ये दिसते. दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पसरले होते.
अनेक यंत्रणांकडून बचावकार्य
दिल्ली पोलीस, दिल्ली अग्निशमन सेवा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी बचावकार्य हाती घेतले. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्यात आला.
स्थानिकांना जाणवले भूकंपासारखे हादरे
इमारत कोसळताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही स्थानिकांना जमीन हादरत असल्याने भूकंप झाल्याचा भास झाला. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून ढिगारा हटवण्याचा प्रयत्न केला.
"आम्हाला जमीन हादरत असल्याचे जाणवले. आम्ही बाहेर धावत आलो तेव्हा एक घर पूर्णपणे कोसळल्याचे दिसले," असे लखनऊ येथील विद्यार्थी रोशन पाल यांनी सांगितले.
"मी बाहेर आलो तेव्हा सर्व दिशांना धुळीचे लोट पसरत होते. तेव्हाच आम्हाला इमारत कोसळल्याचे समजले. त्यानंतर आम्ही लगेचच भिंतीचा एक भाग हटवण्यास सुरुवात केली. त्याखाली सात विद्यार्थी अडकले होते," असे स्थानिक रहिवासी राहुल गौर यांनी सांगितल्याचे 'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तात म्हटले आहे.
१० जखमी रुग्ण ट्रॉमा सेंटरमध्ये
एम्सच्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर १० रुग्णांना जेपीएन ॲपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन जणांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एका रुग्णावर हातापायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. एका किरकोळ जखमीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
तळघरातील बांधकामामुळे दुर्घटना घडल्याचा दावा
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती. इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचा दावाही स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तळघरात सुरू असलेल्या बांधकामामुळे इमारतीची संरचना आणखी कमकुवत झाली होती का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत तळघरात वारंवार पाणी साचत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पाणी साचणे आणि सुरू असलेल्या बांधकामाचा इमारतीच्या पाया व संरचनेवर परिणाम झाला होता का, याची तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.
मालकासह संबंधितांची चौकशी होणार
पोलिसांनी इमारतीच्या मालकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बांधकामासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, पावसाळ्यात काम का सुरू होते आणि या कामामुळे इमारतीच्या सुरक्षेवर परिणाम झाला का, याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.
रेस्क्यू ऑपरेशनला वेग; ८० टक्के ढिगारा हटवला
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आतापर्यंत सुमारे ८० टक्के ढिगारा हटवण्यात आल्याची माहिती दिली. केवळ तळघरातील ढिगारा हटवण्याचे काम बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
तळघरात पाणी साचले होते. जुन्या इमारतीत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासोबत तळघरातील पाणी साचल्यामुळे इमारत कोसळल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे, असे रेखा गुप्ता यांनी सांगितले.
या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. जखमींवर योग्य उपचार सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती दिली जात आहे.
दरम्यान, कोसळलेल्या इमारतीतील तसेच शेजारील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले.
धोकादायक इमारत पाडण्याचे एमसीडीचे आदेश
एमसीडी (Municipal Corporation of Delhi) च्या तपासणीत सत्य निकेतन येथील इमारत क्रमांक १३ ही जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळले होते. त्यामुळे दिल्ली महानगरपालिका कायदा, १९५७ अंतर्गत ही मालमत्ता आदेश मिळाल्यापासून तीन दिवसांत पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालकाने आदेशाचे पालन न केल्यास एमसीडीकडून कारवाई करून त्याचा खर्च कर थकबाकीप्रमाणे वसूल केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर दिल्लीतील पेइंग गेस्ट निवास, बांधकाम नियम आणि दाट लोकवस्तीच्या भागातील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरून सरकारवर टीका करत, अशा निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, असा सवाल केला आहे.