नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील सर्वच भागात प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव घुसमटू लागला आहे. यामुळे आता दिल्लीत लग्न करताना फुलांच्या माळा, सजावट, स्वादिष्ट अन्न आणि संगीत आदींबरोबरच ‘एअर प्युरिफायर’ ही बाब अत्यंत आवश्यक बाब बनली आहे.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असताना आणि आकाश धुरकट होत असताना, लग्नसमारंभ आयोजित करणाऱ्या कुटुंबांनी आपल्या पाहुण्यांना स्वच्छ हवा मिळण्यासाठी नियोजनात बदल केले आहेत. पाहुण्यांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून विवाह समारंभात ‘एअर प्युरिफायर’पासून ते विविध प्रकारचे मास्क उपलब्ध करण्यात येऊ लागले आहेत.
‘विवाह लक्झरी वेडिंग्ज’चे मोहसिन खान सांगतात की, त्यांच्या अनेक क्लायंट्सनी इनडोअर इव्हेंटसाठी ४ ते १० ‘एअर प्युरिफायर’ मागवले आहेत. लोक स्वच्छ हवेच्या बदल्यात २० ते ४० हजार रुपये अधिक खर्च करायला तयार आहेत. ‘एअर प्युरिफायर’ भाड्याने घेण्याचा खर्च साधारणपणे प्रत्येकी ३ ते ४ हजार रुपये आहे. ब्रँड आणि इतर घटकांनुसार त्याची किंमत ठरते. खान हे १५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.
खान म्हणाले, “जे लोक परदेशातून आलेले आहेत, त्यांच्याकडून ‘एअर प्युरिफायर’ची मागणी जास्त आहे. ‘एनआरआय’ जोडपी तर प्रदूषणाच्या या परिस्थितीत आपले लग्न दुसरीकडे हलवण्याचाही विचार करत आहेत. ‘एनआरआय’ कुटुंबे ते १०० च्या खाली असलेल्या हवा दर्जा निर्देशांक पातळीला सरावलेले असतात. जेव्हा दिल्लीत येऊन ४०० हवा दर्जा निर्देशांक पाहतात, तेव्हा ते खरोखर चिंताग्रस्त होतात," असे खान यांनी सांगितले.
‘मेगा वेडिंग्ज अँड इव्हेंट्स’च्या मेघा जिंदल यांनीही यावर सहमती दर्शवली. त्या म्हणाल्या, सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमासाठी विशेषतः संगीत कार्यक्रमांसाठी, आता हॉटेलांकडे ‘एअर प्युरिफायर’ची मागणी केली जाते. बँक्वेट हॉल्सपासून ते संगीत समारंभांपर्यंत अनेक कुटुंबे अनेक प्युरिफायर भाड्याने घेऊन ठिकाणांना लहान ‘क्लीन-एअर झोन’मध्ये रूपांतरित करत आहेत. काही कुटुंबे खुल्या लॉन्समधील लग्ने रद्द करून ‘इनडोअर हॉल्स’ निवडत आहेत, तर काही जण तर थेट मसुरी, चंदिगड किंवा आसपासच्या शहरांमध्ये स्थलांतर करत आहेत.
दक्षिण दिल्लीतील लग्न आयोजक संगीता यांनी सांगितले, ‘मध्यमवर्गीय कुटुंबेही या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. कारण मोठे लॉन्स परवडत नाहीत, म्हणून बँक्वेट हॉल्स हेच सुरक्षित पर्याय आहेत. आरोग्याप्रति जागरूक ग्राहक तिथेही ‘एअर प्युरिफायर’ मागतात. अनेक जण ते बुफेजवळ किंवा स्टेजच्या बाजूला ठेवतात, जेणेकरून ते फार ‘ओव्हर’ वाटू नये, असे त्यांनी सांगितले.
संगीताने एक अनुभव सांगितला की, एका क्लायंटने लग्न विधीदरम्यान वधूसाठी खास पोर्टेबल प्युरिफायरची मागणी केली होती. एका डॉक्टर कुटुंबातील क्लायंटने सांगितले, ‘आम्हाला हे दाखवायचे नाही की आम्ही फार खर्च करतो, पण काही प्युरिफायर हवेतच. म्हणून त्यांनी तीन प्युरिफायर हे डीजे कन्सोल आणि स्टेजच्या मागे लपवले,’ असे तिने सांगितले. पश्चिम दिल्लीतील एका लग्नाच्या प्लॅनरने सांगितले की, आता हवेच्या गुणवत्तेचा प्रभाव वधूच्या फॅशनवरही दिसू लागला आहे. ‘एका वधूने आपल्या कपड्याशी जुळणारा मास्क घातला होता. काही फंक्शनसाठी ती आणि वर दोघेही मास्क घालूनच आले,’ असे तो म्हणाला. ‘एका सकाळच्या लग्नात निम्म्याहून अधिक पाहुणे स्वतःचे मास्क घेऊन आले होते,’ असे एका प्लॅनरने सांगितले.
दिल्लीकरांचा उत्साह कायम
धुरक्याच्या आणि प्रदूषणाच्या छायेतही, लग्नसमारंभांबाबत दिल्लीकरांचा उत्साह मात्र अजिबात कमी झालेला नाही. दिल्लीची लग्ने काहीही सहन करू शकतात. त्यांनी कोविड-१९ महामारीही पार केली आणि आता प्रदूषणालाही तोंड देत आहेत,’ असे एका प्लॅनरने सांगितले.