ऑर्डर पोहोचवायला अवघे पाच मिनिटं उशीर झाल्याने एका डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकारावर संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला एक डिलिव्हरी बॉय अपार्टमेंटमध्ये डिलिव्हरी देण्यासाठी आल्याचं दिसत आहे. त्याचवेळी एका फ्लॅटमधून एक व्यक्ती बाहेर येते आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात करते.
काही क्षणांतच हा वाद वाढतो आणि संबंधित व्यक्ती डिलिव्हरी बॉयला मारहाण करताना दिसते. त्याच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला जातो. मोबाईल परत मागत असतानाच त्याला कानशिलात लगावल्याचं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
डिलिव्हरी बॉयला जबरदस्तीने फ्लॅटमध्ये नेलं
व्हिडीओमध्ये एक महिला फ्लॅटमधून बाहेर येताना आणि संपूर्ण प्रकार सुरू असताना तिथे उभी असल्याचं दिसतं. त्यानंतर डिलिव्हरी बॉयला जबरदस्तीने फ्लॅटच्या आत नेलं जातं. फ्लॅटमध्ये नेल्यानंतरही त्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही वेळाने तो तरुण फ्लॅटमधून बाहेर येताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो.
फक्त ५ मिनिटांच्या उशिरामुळे मारहाण?
मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयचं नाव अमित असून, डिलिव्हरी पोहोचवण्यास अवघे पाच मिनिटं उशीर झाल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मेरठमधील भावनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा हाईट्स अपार्टमेंटमध्ये घडल्याची माहिती आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची दखल
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. व्हायरल व्हिडीओच्या आधारे घटनेचं ठिकाण, वेळ आणि त्यातील व्यक्तींची ओळख याबाबत तपास सुरू आहे. तसेच घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.