Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक (Photo-X)
राष्ट्रीय

Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक

दोघांनी गोल्ड आणि सिल्व्हर पासचा वापर करून कॉन्सर्टमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर...

किशोरी घायवट-उबाळे

इंदूर : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. इंदूरमधील सी२१ इस्टेट ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत प्रेक्षकांचे मोबाईल चोरल्याचा आरोप या दोघांवर आहे. खजराना पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे सहा मोबाईल फोन जप्त केले असून, त्यात तीन आयफोन आणि तीन सॅमसंग फोनचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले दोघेही दिल्ली आणि लखनऊ येथील रहिवासी आहेत.

गोल्ड आणि सिल्व्हर पासचा वापर करून कॉन्सर्टमध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझिम खान (५२, रा. जुनी दिल्ली) आणि सुरेंद्र (३७, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांनी गोल्ड आणि सिल्व्हर पासचा वापर करून कॉन्सर्टमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कार्यक्रमस्थळी असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्यांनी प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरल्याचा आरोप आहे.

कॉन्सर्टदरम्यान मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर खजराना पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथक तैनात केले होते.

पळून जाण्याचा प्रयत्न फसला

रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सी२१ इस्टेट ग्राउंडजवळ पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या. पोलिसांचे पथक दिसताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परिसराला घेराव घालून दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी कॉन्सर्टमध्ये पासच्या माध्यमातून प्रवेश करून गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन आयफोनसह सहा मोबाईल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यामध्ये तीन आयफोन आणि तीन सॅमसंग फोन आहेत. प्राथमिक तपासात हे दोघे दिल्ली आणि लखनऊ येथून कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय मोबाईल चोरीच्या नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरीच्या नेटवर्कचा तपास सुरू

या प्रकरणी खजराना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची चौकशी करून या चोरीच्या नेटवर्कमधील अन्य सदस्यांचा शोध घेतला जात आहे. विविध राज्यांमध्ये झालेल्या मोबाईल चोरीच्या घटनांशी या आरोपींचा संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

इंदूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली खजराना पोलीस ठाण्याचे प्रभारी के. पी. यादव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित

Raigad Fire : उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग! मोठ्या स्फोटाने परिसर हादरला; धुराचे लोट हवेत, VIDEO

ठाण्यात छठपूजेच्या उत्सवाला गालबोट; २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

छठपूजेचा प्रसाद खाल्ल्याने आईचा संताप अनावर; चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू