पुणे : वक्फ बोर्डाच्या जागांचा बेकायदा आणि गैरवापर बंद होऊन या जागा मुस्लिमांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात येण्यासाठी सुधारणा विधेयक मांडण्यात आले आहे. मात्र, सरकार मुस्लिमांच्या जमिनी काढून घेणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. हा अपप्रचार तातडीने थांबवावा, कोणीही या विधेयकाची चुकीची मांडणी करून दिशाभूल करू नये, असे आवाहन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी पुण्यात केले.
मॉडर्न महाविद्यालयातील युवा कनेक्ट कार्यक्रमासाठी आलेल्या रिजिजू यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. वक्फ कायद्यात बदल व्हावा, जागांचा योग्य वापर व्हावा, यासाठी या कायद्यातील सुधारणांना मुस्लीम समाजातील अनेक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. त्यावर नागरिकांनी सव्वा कोटींहून अधिक हरकती सूचना पाठवल्या आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे.
इतक्या हरकती सूचना येतील, असा विचारही कोणी केला नव्हता. यातील सर्व हरकती सूचनांची दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारची कामगिरी, राज्यातील महायुती सरकारची कामगिरी पाहून महाराष्ट्राची जनता महायुतीलाच पाठिंबा देईल. राज्यात जातीपातीवरून विभाजन करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही’
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर केंद्र सरकारची कार्यपद्धती बदलली. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वृत्तपत्रांत सतत सरकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या असायच्या. मात्र, दहा वर्षांत मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. आम्ही आमची प्रतिमा स्वच्छ ठेवली आहे, असे किरेन रिजिजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
‘राजकारणी करतात ते राजकारण असा गैरसमज’
विकसित भारतासाठी तरुणांनी त्यांना जे योग्य वाटते ते करावे. राजकारणी करतात ते राजकारण असा गैरसमज आहे. पण राजकारण सगळीकडे आहे. खेळातही राजकारण आहेच. उद्योग क्षेत्रातील राजकारणाची तर कल्पनाही करता येणार नाही. शिक्षण क्षेत्रात, प्राध्यापकांमध्येही राजकारण होते. तरुणांना निवडणुकीच्या राजकारणात उतरायचे असल्यास स्वागतच आहे, असे मत रिजिजू यांनी मांडले.