नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या ताफ्यात नवे हत्यार येणार असून, त्यामुळे लष्कराचे सामर्थ्य वाढणार आहे. ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र सोडून लक्ष्यभेद करण्यात ‘डीआरडीओ’ला यश आले आहे. अचूक निशाणा साधत शत्रूचा खात्मा करणाऱ्या या नव्या संशोधनाची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) ड्रोनद्वारे क्षेपणास्त्राचा मारा करून लक्ष्याचा भेद करण्यात यश आले आहे. ‘डीआरडीओ’ने आंध्र प्रदेशातील कुरूनूलमध्ये यूएव्ही प्रिसिजन गाईडेड मिसाईलची चाचणी घेतली. या यशाबद्दल राजनाथसिंह यांनी ‘डीआरडीओ’चे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. यामुळे देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली असल्याचेही ते म्हणाले.
भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी ‘डीआरडीओ’ने आंध्र प्रदेशातील कुरूनूलमध्ये ‘नॅशनल ओपन एरिया’तील रेंजमध्ये प्रिसिजन गाईडेड मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ‘यूएलपीजीएम व्ही-३ यंत्रणा’ वजनाने हलकी, अचूक आणि हवेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने करता येईल अशा पद्धतीने विकसित करण्यात आली आहे, असे राजनाथ म्हणाले. भारतीय उद्योग आता महत्त्वाची संरक्षण तंत्र प्रणाली विकसित करण्यास सज्ज झाली असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले.
इमेजिंग इन्फ्रारेड (आयआयआर) सीकर
हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे, ड्युअल-थ्रस्ट प्रोपल्शन सिस्टीममुळे मिसाइलची रेंज आणि गती दोन्ही सुधारल्या आहेत. हवेतून सोप्या प्रकारे लाँच होणारे असल्याने विविध प्रकारच्या ड्रोन आणि हवाई यंत्रांवर सहज बसवता येते. हे क्षेपणास्त्र हलके असून, अचूकता आणि लवचिकता यावर भर देऊन तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे हे विविध युद्ध परिस्थितींमध्ये प्रभावी ठरू शकते.
आत्मनिर्भरता
‘डीआरडीओ’च्या ‘व्ही-३’च्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय संरक्षण उद्योग प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचे उत्पादन करू शकतो, हे दिसून येते. यामुळे भारताला स्वदेशी संरक्षण उत्पादनात अधिक आत्मनिर्भरता प्राप्त होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख अधिक बळकट होईल.
तंत्रज्ञानातील सुधारणा
‘डीआरडीओ’च्या ‘टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी’ने (टीबीआरएल) विकसित केलेल्या ‘व्ही-२’नंतर ‘व्ही-३’ या नवीन व्हर्जनमध्ये अनेक तंत्रज्ञानात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत.