अफगाणिस्तानात बुधवारी झालेल्या भीषण भूकंपात एक हजार जण ठार झाले असून दीड हजार लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेने दिली आहे.
अफगाणिस्तानात सध्या तालिबानची राजवट असल्याने आंतरराष्ट्रीय मदत संस्था अफगाणिस्तानातून निघून गेल्या आहेत. त्यामुळे मदत व बचावाचे मोठे संकट तेथे उभे राहिले आहे.
अफगाणिस्तानच्या ग्रामीण व डोंगराळ भागात हा भूकंप झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा भूकंप ६.१ रिश्टर स्केलचा असून यामुळे अनेक इमारती, घरे पडली आहेत.
या भूकंपामुळे तालिबान सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कारण गेल्यावर्षी अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले. त्यामुळे तालिबानलाच मदत व बचावाची जबाबदारी पेलावी लागणार आहे.
पाकिस्तानच्या हवामान खात्याने सांगितले की, अफगाणच्या पाक्तिका प्रांतात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत जाणवले.
लोक ब्लँकेटमध्ये गुंडाळून नागरिकांना नेत असून खुर्चीवर बसून अनेकजण सलाईन लावताना दिसत आहेत.
दरम्यान, अफगाण रेड क्रेसेंट सोसायटीने ४ हजार ब्लँकेट, ८०० तंबू व ८०० किचन किटस् आपदग्रस्त भागात पाठवले आहेत.
पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंड यांनी तातडीची बैठक बोलावली असून ट्विटरवरून तालिबानने मदतीची मागणी केली आहे.