नवी दिल्ली : खाद्यतेलाच्या पॅकिंग आकाराचे मानकीकरण करण्यासाठी सरकार नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे ग्राहकांसाठी किमतींमधील पारदर्शकता सुधारेल आणि उत्पादकांसाठी स्पर्धेचे समसमान वातावरण निर्माण होईल, असे उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचे म्हणणे आहे.
सध्या बाजारात ८५० मिली, ८७५ मिली, ९०० मिली आणि ९५० मिली अशा अ-प्रमाणित आकारांचे पॅकेट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहकांना विविध ब्रँड्सच्या किमतींची तुलना करणे आणि प्रति-लिटरनुसार उत्पादनाची खरी किंमत निश्चित करणे कठीण जाते. प्रस्तावित नियमांमुळे या समस्येचे निवारण होण्याची अपेक्षा आहे.
ग्राहक संरक्षण, पारदर्शक लेबलिंग आणि शाश्वत पॅकेजिंग पद्धतींवर नियामक मंडळाने लक्ष केंद्रित केले असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
‘पी मार्क’ मोहरीच्या तेल ब्रँडचे प्रवर्तक आणि ‘पुरी ऑइल मिल्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक पुरी म्हणाले, भारत सरकारने या महत्त्वाच्या समस्येची दखल घेतली आहे आणि अ-प्रमाणित पॅकिंग आकार नियंत्रित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
ग्राहकांसाठी पारदर्शकता आणि स्पष्टता
ग्राहकांना स्पष्ट, पारदर्शक आणि तुलना करता येण्याजोग्या किमती मिळाल्या पाहिजेत, यावर आम्ही अनेक वर्षांपासून सातत्याने भर देत आहोत. पॅकिंग आकाराच्या मानकीकरणामुळे ग्राहकांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल आणि बाजारातील स्पर्धा पॅकेजिंगच्या क्लृप्त्यांवर आधारित न राहता गुणवत्ता, शुद्धता आणि मूल्यावर आधारित असेल, असे पुरी यांनी सांगितले.
विश्वासार्हता वाढणार : प्रमाणित पॅकिंग आकारामुळे ग्राहकांसाठी उत्पादनांची तुलना करणे सोपे होईल आणि पॅकेज्ड खाद्यतेलावरील त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे केंद्रीय मंत्री पुरी यांनी नमूद केले. पर्यावरणाला पूरक, उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी या मानकीकरणाचे संभाव्य पर्यावरणीय फायदेही अधोरेखित केले आहेत.
प्लास्टिकचा वापर कमी होणार: वेगवेगळ्या आकाराच्या पॅकिंगसाठी स्वतंत्र बाटल्यांचे साचे, लेबल्स आणि पॅकेजिंग फॉरमॅट्स लागतात. यामुळे सप्लाय-चेन अधिक गुंतागुंतीची होते आणि साहित्याचा वापर वाढतो. पॅकेजिंगचे मानकीकरण केल्यास टाळता येण्याजोगा प्लास्टिकचा वापर कमी करण्यास मदत होईल.
समान मूल्य: पुरी ऑइल मिल्स ही उद्योग क्षेत्रातील चर्चा आणि भागधारकांच्या बैठकांद्वारे पॅकिंग आकाराच्या मानकीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.