राष्ट्रीय

निवडणूक आयोग-तृणमूल जोरदार खडाजंगी; मुख्य निवडणूक आयुक्तांनी सुनावले, 'चालते व्हा!'

निवडणूक आयोग आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील वाद बुधवारी विकोपाला गेला. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेल्या तृणमूलच्या शिष्टमंडळाला मुख्य निवडणूक आयुक्तांनी (सीईसी) ‘चालते व्हा’ (गेट लॉस्ट) असे सुनावल्याची जोरदार चर्चा आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणूक आयोग आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील वाद बुधवारी विकोपाला गेला. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेल्या तृणमूलच्या शिष्टमंडळाला मुख्य निवडणूक आयुक्तांनी (सीईसी) ‘चालते व्हा’ (गेट लॉस्ट) असे सुनावल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने तृणमूल नेत्यांवर आयोगाच्या दालनात आरडाओरडा केल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणि निवडणूक आयोगाचे भाजपशी ‘छुपे संधान’ असल्याचा आरोप करत तृणमूलच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात राज्यसभा नेते डेरेक ओब्रायन, सागरिका घोष, साकेत गोखले आणि मेनाका गुरुस्वामी यांचा समावेश होता. अवघ्या सात मिनिटांतच ही बैठक अत्यंत कटू वातावरणात संपली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डेरेक ओब्रायन यांनी आयोगावर गंभीर आरोप केले.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिलेली ९ पत्रे आम्ही आयुक्तांना सोपवली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. भाजपशी जवळीक असलेल्या ६ निवडणूक अधिकाऱ्यांची यादी आम्ही पुराव्यासह दिली आणि त्यांच्या बदलीची मागणी केली.जेव्हा आम्ही निष्पक्ष निवडणुकांबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आम्हाला थेट ‘गेट लॉस्ट’ म्हटले, असा दावा ओब्रायन यांनी केला. तृणमूल नेत्यांनी पुढे म्हटले की, आम्ही आयुक्तांना सांगितले की आम्ही तुमचे ऐकणार नाही, कारण तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांनाही बोलू देत नाही.

निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर

  • निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून तृणमूलच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

  • आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, डेरेक ओब्रायन यांनी आयुक्तांवर ओरडण्यास सुरुवात केली आणि त्यांना बोलण्यापासून रोखले. शिष्टमंडळाला सभ्यतेचे पालन करण्याची विनंती करण्यात आली होती.

  • आयुक्तांनी तृणमूलला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, यावेळी बंगालमधील निवडणुका भीतीमुक्त, हिंसाचारमुक्त आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांशिवाय (बूथ जामिंग इ.) पार पडतील.

सोशल मीडियावर युद्ध

या घटनेनंतर तृणमूलच्या नेत्यांनी आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. खासदार सागरिका घोष यांनी आयोगाचा दावा धादांत खोटा असल्याचे सांगत मुख्य निवडणूक आयुक्तांचा उल्लेख 'वॅनिश'कुमार असा केला. तर साकेत गोखले यांनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणूक आयोग केवळ एका पक्षाला लक्ष्य करून पोस्ट करण्याची हिंमत कशी दाखवू शकतो, ते भाजपला असेच 'स्ट्रेट टॉक' देऊ शकतात का.

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

सरकारी भूखंड ४९ वर्षांसाठी भाड्याने मिळणार; सरकारकडून जुन्या धोरणात सुधारणा

शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

युद्धविराम पण तात्पुरता; अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता