राष्ट्रीय

Electoral bonds: काँग्रेस आक्रमक, भाजप बचावात्मक! भाजपची बँक खाती गोठवा, उच्चस्तरीय चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय स्टेट बँकेला पुन्हा एकदा फटकारल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपची कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. रोखे प्रकरणातील भ्रष्टाचाराबद्दल केंद्रातील भाजप सरकारची सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय चौकशी करावी आणि पक्षाची बँक खाती गोठवावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. या रोख्यांद्वारे जो निधी उपलब्ध झाला त्यापैकी ५० टक्के रक्कम भाजपला मिळाली आहे, असा दावाही काँग्रेसने केला आहे.

निवडणूक रोखे माहितीवरून भाजपचे भ्रष्ट डावपेच उघड झाले आहेत. ज्या कंपन्यांनी देणग्या दिल्या त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, परंतु आता असे दिसून येते की मोदी म्हणतात, ‘सिर्फ भाजप को खिलाऊंगा’, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चढविला आहे. जबरदस्तीने पैशांची लूट करून लोकशाहीचा गळा घोटण्याची ही गाथा आहे, त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि सत्य उजेडात येईपर्यंत भाजपची बँक खाती गोठवावी, अशी मागणीही खर्गे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरून केली आहे.

स्टेट बँकेने रोख्यांबाबत जी माहिती दिली आहे त्यावरून रोखे विक्रीतून जो निधी मिळाला त्यापैकी ५० टक्के रक्कम भाजपला मिळाली असल्याचे स्पष्ट होत असून काँग्रेसला केवळ ११ टक्केच निधी मिळाला आहे, अनेक बोगस देणगीदार आहेत, ते कोण आहेत, त्या कोणत्या कंपन्या आहेत, ईडी, आयटी आणि सीबीआयने छापे टाकल्यानंतर अनेक कंपन्यांनी देणग्या का दिल्या, अशा कंपन्यांवर दबाव कोणी आणला, असे सवालही खर्गे यांनी उपस्थित केले आहेत.

काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठविण्यात आली असताना ज्या भाजपने बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये गोळा केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीबरोबरच भाजपची बँक खाती त्वरित गोठवावी, अशी आमची मागणी असल्याचे खर्गे म्हणाले.

'ईडी' भाजपचे खंडणीवसुली पथक - अशोक गेहलोत

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही निवडणूक रोखे प्रश्नावरून भाजपवर टीका केली आहे. रोख्यांचा तपशील जाहीर झाल्याने भाजपने केलेली लूट जनतेसमोर आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) म्हणजे भाजपचे खंडणीवसुली पथक आहे, बेटिंग आणि जुगार खेळणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने देणग्या घेतल्या आहेत, असे गेहलोत म्हणाले.

निवडणूक रोखे हे जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकेट

भिवंडी : निवडणूक रोखे हे भाजपप्रणीत केंद्र सरकारचे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. निवडणूक रोखे योजनेद्वारे मिळालेला निधी भाजपने राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्यासाठी व विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी वापरला. पंतप्रधान मोदी यांनी राजकीय अर्थकारण स्वच्छ करण्याची भाषा करून निवडणूक रोखे पद्धत आणली, पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे, असे ते म्हणाले.

भाजपचे भ्रष्ट डावपेच उघड - जयराम रमेश

निवडणूक रोख्यांबाबतची जी माहिती जाहीर करण्यात आली त्यावरून काँग्रेस पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली आहे. रोख्यांबाबतची माहिती जाहीर झाल्याने भाजपचे भ्रष्ट डावपेच चव्हाट्यावर आले आहेत. जवळपास १३ हजारांहून अधिक कंपन्या आणि व्यक्तींनी २०१९ पासून रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सहा हजार कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ज्या कंपन्यांनी भाजपला देणग्या दिल्या त्या कंपन्यांना तातडीने सरकारकडून मोठा लाभ झाला आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

सीतारामन यांच्याकडून भाजपचा बचाव

सक्तवसुली संचालनालयासह अन्य तपास यंत्रणा आणि सत्तारूढ पक्षाला मिळालेल्या निवडणूक देणग्या यांचा सुतराम संबंध नाही, असे स्पष्टीकरण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या रोखे प्रश्नावरून भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी सरसावल्या आहेत. याबाबत जे आरोप केले जात आहेत ती केवळ गृहितके आहेत, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. जर कंपन्यांनी निधी दिला आणि त्यानंतर ईडीद्वारे आम्ही त्यांच्या दरवाजावर गेलो, हे संभाव्य आहे की नाही. मात्र ईडी त्यांच्या दरवाजावर गेली आणि स्वबचावासाठी कंपन्या निधी घेऊन आल्या हे गृहितक आहे, त्याचप्रमाणे या कंपन्यांनी भाजपलाच निधी दिला याची तुम्हाला खात्री आहे हेही दुसरे गृहितक आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त